Vidhan Parishad Election 2024 : मुंबई : नुकत्याच राज्यातील लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) सर्व टप्प्यातील मतदान (Voting) पार पडलंय. अशातच आता प्रतिक्षा आहे, 4 जूनला येणाऱ्या निकालाची. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) पक्षपुटीनंतरची पहिलीच निवडणूक असल्यामुळे सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, लोकसभेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही, अशातच आता सर्व पक्षांनी आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. लोकसभेच्या निकालानंतर लगेचच विधान परिषद निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी सर्व पक्षांनी आपापली रणनिती आखून उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. पण विधान परिषदेवरुन महायुतीत खणाखणी सुरू असल्याचं समोर येत आहे. याचं कारण ठरलंय, मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Konkan Graduate Constituency Election) अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या नावाची केलेली घोषणा. 


महायुतीत विधानसभेचं बिगुल वाजण्याआधीच जागांवरून रस्सीखेच सुरू झालेली असतानाच, लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी, भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी अचानक अभिजीत पानसेंचं नाव जाहीर करून भाजपची पुरती गोची केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 


राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अतिरीक्त मदतीमुळे, यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे, महायुतीच्या गोटात मिठाचा खडा टाकल्याची चर्चा रंगली आहे. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.


कोकण पदवीधर मतदारसंघावरुन महायुतीत मोठा पेच? 


विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावरून महायुतीत पेच होऊ शकतो. कारण या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्या मनसेचे अभिजीत पानसे आणि शिवसेनेचे संजय मोरे यांची नावं चर्चेत आहेत. मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघात अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केलीय. या मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार असून, एक जुलैला त्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मनसे महायुतीत असूनही अभिजीत पानसेंना या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं ही उमेदवारी मनसेची की महायुतीची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदींना पाठिंबा दिलेला, विधान परिषदेत मोदी नाहीत : अभिजीत पानसे


मनसेचे उमेदवार अभिजीत पानसेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदींना पाठिंबा दिला होता, विधान परिषदेत मोदी नाहीत, असं वक्तव्य अभिजीत पानसेंनी केलं आहे. त्यामुळे विधानपरिषदेत मनसेचा महायुतीला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट होतंय. आता या मतदारसंघाचा तिढा कसा सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


भाजपच्या जागेवर मनसेचा उमेदवार जाहीर, सेनाही आग्रही; कोकण पदवीधर निवडणुकीत कोण होणार आमदार?