मुंबई : लोकसभा निवडणुकीतील जागावाटप करताना महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप (BJP) मोठा भाऊ ठरला असून अजित पवारांचा राष्ट्रवादी धाकटा भाऊ असल्याचे दिसून आले. कारण, महायुतीच्या जागावाटपात भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढवली. तर, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून अजित पवारांना केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. तर, राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील 1 जागा रासपच्या महादेव जानकर यांना देऊ केली. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत ही नाराजी उघड झाल्याचं दिसून आलं. मंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विधानसभेला किती जागा हव्यात हेच जाहीरपणे सांगितले. त्यावर, आता उपमुख्यमत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली. 


महायुतीच्या जागावाटपात लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 28 जागा घेतल्या. तर, मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेनं ओढून-ताणून 15 जागांपर्यंत मजल मारली होती. मात्र, जागावाटपात महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यावरुन, विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्ली उडवली होती. तर, पक्षातील काही नेतेही नाराज झाले होते. आता, छगन भुजबळ यांनी जागावाटपातील आपली नाराजी उघड केली आहे.


विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना परखड भूमिका मांडली. त्यामुळे, लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे. 


आम्ही मनुस्मृती जाळली - भुजबळ


भाजपने 400 पार चा नारा दिला. त्यामुळे दलित समाजात संविधान बदलणार हे बिंमल गेलं. ते त्यांच्या मनातून काढण्यासाठी नाकी नऊ आले. पंतप्रधान मोदींनाही त्यांच्या अनेक मुलाखतीतून वारंवार संविधान बदलणार नसल्याचं सांगावं लागते. आता नवीन मनुस्मृतीचं आलंय, आता झालं कल्याण. आम्हाला चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नाही. त्यामुळेच, आम्ही मनुस्मृति जाळली आहे. हे थांबलं पाहिजे नाहीतर यातून मोठा भडका उडेल, असेही छगन भुजबळ यांनी म्हटलं. पाठ्यपुस्तकातून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ. हे तुकोबांनी सांगितलेलं शिकवलं पाहिजे. पृथ्वी ही शेषनागाच्या फळावर नसून ती श्रमिकांच्या हातावर आहे हे शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे. हे नवीन मनुस्मृतीचं काय आलंय? असा सवालही भुजबळ यांनी विचारला.  


आमदारांना ताकद द्यावी


पहिली निवडणूक संपली आहे, तोच दुसरी निवडणूक सुरू झाली. लवकरच आचारसंहिता सुरू होतील. आचारसंहिता सुरू झाल्यामुळे पुन्हा काम थांबतील. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, यातून आपल्याला मार्ग काढायला पाहिजे, जेणेकरून आमदारांना ताकद मिळेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.  तर, माझं अजित पवारांना सांगणं आहे की, आमदारांची काम ताबडतोब मंजूर करा. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी कामांचा नारळ फुटला पाहिजे. याचा फायदा आमदारांना होईल, असेही भुजबळ म्हणाले. 


भुजबळांच्या विधानावर फडणवीस म्हणाले


दरम्यान, छगन भुजबळ यांनी 80 ते 90 जागांवर दावा केल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, भाष्य करताना महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे.  त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील. तसेच, इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू, असे फडणवीसांनी म्हटले.