सांगली: विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच पक्षात ताक घुसळल्यासारखी स्थिती निर्माण होईल. राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन पक्ष झाल्याने उमेदवारांची रेलचेल असेल, असे वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी  केले आहे. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये  अद्यावत एमआरआय मशिनचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ या़च्या हस्ते व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी मुश्रीफ प्रसारमाध्यमांशी  बोलत होते.


काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन पक्ष, भाजप, काँग्रेस, आरपीआय, बहुजन वंचित असे अनेक पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) निमित्ताने ताक घुसळल्यासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल होईल. लोकसभेच्या निकालावरुन विधानसभेचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, कारण प्रश्न वेगवेगळे असल्याने, आम्हाला अडचण वाटत नाही असेही मुश्रीफ म्हणाले. तसेच  राज्य शासनाने सामान्य लोकांना केंद्रस्थानी मानत कारभार केला आहे. महिलांन दरमहा अनुदान, शेतकऱ्यांना शेती पंपांना मोफत वीज, यासह अनेक छप्पर फाडके योजना जाहीर केल्याचेही मुश्रीफ यांनी  सांगितले.


लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाचा केवळ एक खासदार निवडून आला होता. या निकालानंतर अजितदादा गटातील अनेक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. रोहित पवार आणि  जयंत पाटील यांच्याकडून याबाबत सूचक वक्तव्य करण्यात आले होते. त्यामुळे विधानसभेपूर्वी अजितदादा गटाला खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये यादृष्टीने राजकीय हालचाली घडू शकतात.


पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादा गटाला हादरा


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआची ताकद वाढली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील नगरसेवक, कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाले आहे. अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच त्यांना जोरदार हादरा बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार यांना कुठून ना कुठून या भेटीची कुणकुण लागेल म्हणून या सर्व नगरसेवकांनी अजितदादांना शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीची कल्पना अगोदरच दिली होती, असे सांगितले जाते.



शरद पवारांना भेटलेले अजित पवार गटातील 8 माजी नगरसेवक कोण?


1) अजित गव्हाणे - शहराध्यक्ष, अजित पवार गट
2) विक्रांत लांडे - माजी नगरसेवक ( माजी आमदार विलास लांडेंचे पुत्र)
3) पंकज भालेकर - माजी नगरसेवक
4) समीर मासुळकर - माजी नगरसेवक
5) संजय वाबळे - माजी नगरसेवक
6) राहुल भोसले - माजी नगरसेवक
7) विनया तापकीर - माजी नगरसेविका
8) वैशाली घोडेकर - माजी नगरसेविका


आणखी वाचा


मोदींनी राम मंदिर बांधलं, मी रामनवमीला जन्मलो याचा अभिमान, जय श्रीराम : हसन मुश्रीफ