कोल्हापूर : महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानात ही सभा होत आहे. या सभेमध्ये बोलताना महायुतीच्या नेत्यांनी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे आवाहन केले. 



महायुतीच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत असलेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक आणि माने यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेतला. तसेच 500 वर्षांची मागणी असलेले राम मंदिर पूर्ण केल्याचे म्हणाले. माझा सुद्धा जन्म राम नवमीला झाला असून याचा मला अभिमान असल्याचे सांगत त्यांनी जय श्रीराम असा नारा दिला. 


मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोदींकडे चार मागण्या कराव्यात, अशी विनंती केली. यामध्ये यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करावी अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली. त्याचबरोबर कोल्हापुरातील अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा, नरसोबावाडीच्या विकासासाठी निधी देण्याची  मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींकडे करावी असे मुश्रीफ म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या