लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. तर, महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वातील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, तत्पूर्वीच याठिकाणी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र उपस्थित होते. त्यामुळे, आदित्य ठाकरेंचा ताफा येताच राणे आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये किल्ल्यावरच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि राणे पिता पुत्र समर्थकांमध्ये मालवणमध्ये राडा सुरू असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरुन राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत भाषण करताना पुतळा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही, असा इशाराही दिला आहे. 
 
लातूर येथील जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी कधीही विरोधकांवर टीका केली नाही, आम्ही कामची माणसे आहोत. आम्ही 15 हजार कोटींचे वीज बिल माफ केले आहे. शेतकऱ्यांनी आता फक्त मोटर चालू करायची आहे, मागच्या वीज बिलाचा विचार करायचा नाही, बाकी मी पाहतो, असे म्हणत अजित पवार यांनी वीजबिल माफी केल्याची माहिती दिली. तसेच, आपल्या राज्याचे बजेट साडे सहा लाख कोटी रुपयांचे आहे, त्यातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी वेगळे पैसे ठेवले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून मी काम करतोय मला माहिती आहे, कसे काम करायचे, असे म्हणत लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरू राहणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. 


अजित पवारांनी मागितली माफी 


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji maharaj) वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तेरा कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे म्हणत अजित पवार यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे.  तसेच, या पुतळ्याचे काम चांगलेच झाले पाहिजे होते, हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर राहिले आहेत. त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात, यातील जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही. आज शब्द देतो की अशी चूक पुन्हा होऊ, नये यासाठी काम करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले. 


महिलांवरील अत्याचारात कोणाचीही गय केली जाणार नाही


बदलापूरला दुःखद घटना घडली आहे, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायम काम केले जाईल. महिला सुरक्षेसाठी कायमच प्राधान्य दिले जाईल. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील दोषींना फाशी आणि जन्मठेप सुनावण्यात येणार आहे.असली विकृती पुन्हा कोणी करू नये, यासाठी कायदा आणखीन कडक केला जात आहे, कोणत्याही पातळीवर हायगाय केली जाणार नाही. कोणी हायगय केली तर तोही जेलमध्ये टाकला जाणार आहे, अशा शब्दात महिला अत्याचाराच्या घटनांवर अजित पवारांनी भाष्य केलं. येथील, सभेत एक महिला सातत्याने महिला असा सूर उंचावला, त्यावर अजित पवार यांनी टिप्पणी केली आहे. 


हेही वाचा


Narayan Rane: तुफान राडा... घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, हातवारे करत नारायण राणेंचा इशारा