Supriya Sule Banner : भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री (Chief Minister) झाला तर हे पद कोणाला मिळणार याची आतापासूनची चर्चा रंगू लागली आहे. याचं कारण म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयबाहेर ठराविक दिवसांच्या अंतराने लागलेले बॅनर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे (Supriya Sule) यांचंही बॅनर मुंबईत लावण्यात आलं. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर काही कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलं होतं. पण नंतर पोलिसांनी लगेचच हे पोस्टर काढल्याची माहिती मिळत आहे.
नाद नाय करायचा...
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसंच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो आहे.
अजित पवार यांचा बॅनर
दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अजित पवार यांचं बॅनर लागलं होतं. ज्यात "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री..., एकच दादा, एकच वादा, अजित दादा..." अशा आशयाचा मजकूर या लिहिलेला होता. तर त्याआधी जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या बॅनरवर त्यांचाही महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तोपर्यंत काही होऊ शकत नाही : अजित पवार?
दरम्यान, भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावले असतील तर त्याला जास्त महत्त्व देऊ नका, उद्या तुमचेही तसे फ्लेक्स लावले जाऊ शकतात. "आमच्यात स्पर्धा नाहीत. तुम्ही खूप मनावर घेऊ नका, फार महत्त्व देऊ नका. जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही. बॅनर लावणं हे त्या कार्यकर्त्यांचं वैयक्तिक समाधान आहे. हे अतिउत्साही कार्यकर्त्यांचं काम असतं. उद्या कोणी भावी पंतप्रधान म्हणून ही फ्लेक्स लावेल, पण बहुमत मिळाल्याशिवाय काही होत नसतं, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी या बॅनरवर दिलं होतं.
जयंत पाटील काय म्हणाले होते?
तर आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा मला विश्वास आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे संख्याबळावर ठरेल. तसंच संख्याबळानुसार राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आलं तर मुख्यमंत्री कोण असेल हे शरद पवारच ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल," असं जयंत पाटील म्हणाले होते.
राष्ट्रवादीकडून तीन नावं आघाडीवर
दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी तीन प्रमुख नावं आघाडीवर असल्याचं म्हटलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे ही प्रमुख नावं मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतात. आतापर्यंत राज्यात अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अशी विविध पदं भूषवलेल्या अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाने मात्र हुलकावणी दिली आहे. तर महाविकास आघाडीची पुढची मुख्यमंत्री महिला असेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय 2014 पासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सक्षम काम करणारे जयंत पाटील यांचं देखील नाव राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असतं.
संबंधित बातमी