मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात झाली असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोलापूर दौऱ्यातूनच आपले विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे, मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे. सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर राज ठाकरेंनी अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले, तर तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी मातेची आरतीही केली. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली असतानाच शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मनसेवर (MNS) जोरदार हल्लाबोल केला आहे. पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) राज ठाकरेंनाच लक्ष्य केलं.
आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. वरळी मतदारसंघातील अनेक विषय आजच्या बैठकीत होते, आयुक्तांसमोर हे सर्व विषय मांडले. त्यानुसार, जे आदेश आयुक्तांनी दिले त्याचे पालन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे आदित्य ठाकरेंनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. यावेळी, पत्रकारांनी मनसेच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता, मनसेसह काका राज ठाकरेंवर देखील बोचरी टीका केली आहे.
''पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात. सुपारी पक्ष, ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू, असे म्हणत आदित्य यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मनसेला लक्ष्य केलं. कोरोना काळात असेल किंवा मुंबई चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होतो का? दुपारी पक्ष तिथेच राहील, वरळीत माझ्या विरोधात मला वाटलं बायडन लढत आहेत,'' असा टोलाही आदित्य यांनी मनसेला लगावला. दरम्यान, यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी बिनशर्ट म्हणत मनसेवर निशाणा साधला होता. तर, वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा असते, त्यावरूनही मनसेला लक्ष्य केलं होतं.
दरम्यान, मनसेनं विधानसभेचं रणशिंग फुंकलं असून दोन उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. मुंबईतून बाळा नांदगावकर आणि पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीला मनसे कशारितीने सामोरे जाते हे पाहावे लागेल.
गणपतीपूर्वीच मुंबईतील रस्ते नीट करा
लवकरच गणपतीचं आगमन होत आहे, पण मुंबईत कुठेही रस्ते चांगले दिसत नाहीत. खड्डे दिसतात, खोदकाम सुरू आहे. मेट्रोला आदेश देऊन त्या ठिकाणचे बॅरिगेट नीट करायला हवेत, गणपतीचे आगमन आणि विसर्जनाचा मार्ग तरी व्यवस्थित करावा, असा टोला
परराष्ट्र मंत्रीच सांगतील
आदित्य ठाकरेंनी बांग्लादेशमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. शेख हसीना भारतात येत असल्यासंदर्भात बोलताना, तो त्यांचा स्थानिक विषय जरी असला तरी आपल्या देशावर याचा परिणाम होऊ शकतो का, याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या बाजूचा हा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती. डोमेस्टिक नाही, पण एक्स्टर्नल अफेअर्समध्ये आपल्याला काय होऊ शकतं का? आपले परराष्ट्रमंत्रीच सांगतील, असेही आदित्य यांनी बांग्लादेश परिस्थितीवर बोलताना म्हटले.