कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातून (Kagal Vidhan Sabha Constituency) विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांना तुतारीच्या चिन्हावर रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) सुरु केल्याची माहिती समोर येत आली होती. शरद पवार गटाकडून समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांना याबाबत ऑफर देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते समरजित घाटगे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. यामुळे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या डोकेदुखीत वाढ होईल, असे बोलले जात होते. आता यावर समरजित घाटगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी डाव टाकायला सुरुवात केली आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजीत घाटगे यांना शरद पवार गटातून मैदानात उतरवून कागल विधानसभा काबीज करण्याचा शरद पवारांचा प्लॅन असल्याचे बोलले जात आहे.
समरजीत घाटगेंचे स्पष्टीकरण
या पार्श्वभूमीवर समरजीत घाटगे यांना तुतारी चिन्हावर कागल विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यासाठी शरद पवार गटाकडून संपर्क झाल्याचे बोलले जात आहे. मात्र हा प्रस्ताव समरजीत घाटगे यांनी स्वीकारलेला नाही. याबाबत ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे. मात्र मी कोणताही प्रतिसाद दिला नाही. उमेदवारी बाबतच्या सगळ्या चर्चा मी देखील माध्यमांवरच बघत आहे, अशी प्रतिक्रिया समरजीत घाटगे यांनी दिली आहे.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
समरजीत घाटगे शरद पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांनी म्हटले की, कागलमध्ये कोण जिंकणार, हे जनताच ठरवेल. अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झाला आहे. माझ्यासमोर कोण उभे राहणार, याची मला चिंता नाही. तिरंगी-चौरंगी कशीही लढत होऊ दे, मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कागल विधानसभेची लढाई सोपी करण्यासाठी मुश्रीफांची खेळी?
दरम्यान, कागल विधानसभेची लढाई सोपी करण्यासाठी हसन मुश्रीफ संजय घाटगे यांना रिंगणात उतरायला सांगतात, त्यासाठी ते घाटगे यांना पैसे देतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरदेखील हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, आईशपथ घेऊन सांगतो मी कधीही संजयबाबा घाटगे यांना विधानसभेला उभा राहण्यासाठी पैसे दिले नाहीत. निवडणूक तिरंगी करण्यासाठी मी संजयबाबा यांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला. पण यात तथ्य नाही, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा