Ujjwal Nikam : तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. यावर आता राजकीय, सामाजिक अशा विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान मलिकांच्या ED अटकेनंतर सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


....तर मलिकांच्या जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो


राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडी ने नुकतीच अटक केली आहे. या अटकेच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटलंय की, ईडीच्या अधिकाऱ्यांना नवाब मलिक यांच्या विरोधात सकृत दर्शनी काय पुरावा आहे? हे न्यायालयाला पटवून द्यावे लागेल. आणि त्यानंतरच न्यायालय ईडी कस्टडी द्यावी अथवा नाही हे ठरवले जाईल, अर्थात तपास यंत्रणेने कोणत्या प्रकारचा पुरावा गोळा केला आहे. त्या पुराव्याच्या गुणवत्तेवर हे ED कस्टडी किंवा न्यायालयीन कस्टडी राहू शकते. न्यायालय कस्टडी मिळाली तर जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो,  ED कस्टडी मिळाली तर मात्र काही दिवसा साठी इडी कस्टडी मध्ये त्यांना राहावे लागू शकते, असे निकम म्हणाले. 


राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ


नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.