ABP C-Voter Survey : महाराष्ट्रात महायुतीला 'दे धक्का', दिग्गज अडचणीत; राज्यातील या 30 जागांवर उमेदवार आघाडीवर!
राज्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीला ३० जागांवर विजय मिळत असल्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला १८ जागा जिंकता येत आहेत
ABP C voter opinion poll Mahavikas Aghadi - यंदाच्या लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीत भाजपाने अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे. तर, महाराष्ट्रात महायुतीने ४५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा जाहीर भाषणातून आणि मुलाखतींमधून महायुती (Mahayuti) ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचे म्हटले. मात्र, एबीपी सी व्होटरच्या सर्वेक्षणात महायुतीची हवाच निघून गेल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे महायुतीत जागावाटपात फटका बसलेल्या शिवसेना शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही सर्वेक्षणातून मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळते. तर, महाविकास आघाडीला मोठं यश मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सुफडा साफ होत असल्याचा अंदाज आहे.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीला ३० जागांवर विजय मिळत असल्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला १८ जागा जिंकता येत आहेत. महायुतीला जिंकता येत असलेल्या ३० पैकी २२ जागांवर भाजपा उमेदवारांचा विजय होणार असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरुन दिसून येते. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे शिलेदार ९ जागांवर विजयी होतील, असे दिसून येते. विशेष म्हणजे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळा मिळणार असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे, महायुती व महाविकास आघाडीच्या लढाईत यंदा महायुतीची मोठी पिछेहाट होत आहे.दरम्यान, या सर्वेक्षणानुसार राज्यात महाविकास आघाडीला १८ जागांवर विजय मिळू शकतो. या ३० जागांपैकी माढा, बारामती, परभणी, अहमदनगर, शिरुर या जागेंवरील दिग्गजांना धक्का बसणार असल्याचे दिसून येते.
या जागांवर जिंकतील महायुतीचे उमेदवार
अकोला, अमरावती,बीड, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, धुळे, दिंडोरी, जळगाव, जालना, कल्याण, कोल्हापूर, लातूर, मावळ, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रामटेक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रावेर, सांगली, सोलापूर, ठाणे आणि वर्धा या जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहतील, असे सर्वेक्षणातील आकडेवारीवरुन समोर आले आहे. त्यामुळे, ४५ जागांवर विजय मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला ३० जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
एबीपी- सी वोटर सर्व्हेचा अंदाज काय?
महायुती = 30
महाविकास आघाडी = 18
-----------
एकूण = 48
कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप = 21/22
शिवसेना (एकनाथ शिंदे) = 9/10
राष्ट्रवादी (अजित पवार ) = 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) = 9
राष्ट्रवादी (शरद पवार) = 5
काँग्रेस = 3
-----------
एकूण = 48
(नोट : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचार 17 एप्रिल रोजी संपणार आहे. त्याआधी ABP न्यूजसाठी सी व्होटरनं देशभरात लोकांचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 543 जागांवरील ओपिनियन पोल घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांचाही समावेश आहे. प्रकाशित करणाऱ्यात आलेल्या सर्व्हेमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये अंतिम निकालावेळी म्हणजेच 4 जून रोजी बदल होऊ शकतो. ओपिनियन पोलच्या माध्यामातून फक्त लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.)