Aaditya Thackeray on Kalyan Incident : कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडांकरवी मारहाण केली होती. 'तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो', असं म्हणत या अधिकाऱ्याने मराठी भाषिकांना मारहाण केली. या घटनेवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावरून जोरदार हल्लाबोल केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले की, कल्याणची घटना दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकार आणि आताचे सरकार या वादाला हवा देत आहे का? मागच्या महिन्यात एका महिलेला मारवाडीत बोलायला लावले. मुंबई, महाराष्ट्र हे आमचे आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची मग या देशाची आहे. तुम्ही या रहा, काम करा, काही हरकत नाही, काल मराठी माणसाला हत्याराने मारले, जर कोणी त्यांचं तोंड फोडलं तर पोलिसांनी बोलू नये. हे जे कोण आहेत ते एमटीडीसी मधले आहेत. माझी विनंती आहे की, या पार्सलला आले तिथे पाठवावे. मटण-मांस खाण्यावरून बोलले जाते. मुंबई किंवा महाराष्ट्रात शाकाहारी सोसायटी करायचा प्रयत्न केला तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे, मराठी माणसांना घरं दिली नाही तर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पोलिसांना दांडका दाखवण्याचा सल्ला
जर मराठी माणसाला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जर कोणी दादागिरी करू इच्छित आहे तर त्याला पोलिसांनी दांडका काय असतो, हे दाखवणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री जर महाराष्ट्र प्रेमी असतील, या मातीतले असतील तर आमच्या मागणीला मान देऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र द्रोहाचा कायदा आणतील, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू रहिवाशांच्या सोसायटीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC मध्ये अकाऊंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. हा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा. या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला त्रास व्हायचा. तसेच घरात असलेली वयोवृद्ध आईलाही दम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.
देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.
आणखी वाचा