Suhas kande on Chhagan Bhujbal : एकीकडे नागपूरमध्ये सुरु असलेले हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2024) सध्या चर्चेत आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीची जोरदार चर्चा राज्यभरात रंगली आहे. कारण रविवारी (दि. 15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर आता शिवसेना शिंदे गटाचे नांदगावचे आमदार आणि भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे (Suhas Kande) यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधत मोठा दावा केला आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर येथील विजयगड या निवासस्थानी मोठी घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील, अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंखे यांच्यासह बडे नेते अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी देखील अजित पवारांची भेट घेतली आहे.
काय म्हणाले सुहास कांदे?
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. नाशिक जिल्ह्यात जे झालं, ते अतिशय चांगलं वाटलं. मला एकदम छान वाटलं, असा टोला त्यांनी छगन भुजबळांना लगावला. तर भुजबळांबाबत जे सध्या घडलं, त्याचे पुरावे मी वरिष्ठांना दिले होते. माझ्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली, असा दावा देखील सुहास कांदे यांनी केला आहे. आता सुहास कांदे यांच्या दाव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुहास कांदेंनी केलाय समीर भुजबळांचा पराभव
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. कारण छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. त्यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आणि ठाकरे गटाचे गणेश धात्रक यांच्याशी झाली. नांदगावमधील प्रचारादरम्यान भुजबळ विरुद्ध कांदे संघर्ष पाहायला मिळाला होता. मतदारांच्या दिवशी सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची देखील झाली होती. मात्र, या निवडणुकीत सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव केला.
आणखी वाचा