PM Kisan Tractor Yojana: केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदतीसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेसारख्या अनेक योजना राबवते. या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. अनेक वेळा सरकारच्या विविध योजनांची माहिती सोशल मीडियावरून लोकांना मिळते. अलीकडेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' (PM Kisan Tractor Yojana) सुरू केल्याचा दावा केला जात आहे. या योजनेंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदानाचा लाभ दिला जात आहे. अशा परिस्थितीत सरकारनं खरोखरच अशी योजना सुरू केली आहे का?  त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


'पीएम किसान ट्रॅक्टर योजने'बाबतचा दावा खरा की खोटा? 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पीएम किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, या योजनेंतर्गत कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सबसिडी दिली जाईल. तेव्हापासून या योजनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच लोकांना एका वेबसाइटची लिंक देखील पाठवली जात आहे ज्यामध्ये त्यांना लॉगिन करून योजनेचा लाभ घेण्यास सांगितले जाते. आता पीआयबीने या व्हायरल दाव्याचे सत्य शोधून काढले आहे. PIB ने या योजनेची वस्तुस्थिती तपासली आहे. त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर एक संदेश शेअर केला आहे. यामध्ये योजनेच्या सत्यतेबाबत माहिती देण्यात आली असून त्यानुसार केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना नावाची कोणतीही सबसिडी योजना सुरू केलेली नाही. अशा परिस्थितीत अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचा दावा करणारी ही वेबसाइट खोटी असून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही असं  PIB ने म्हटलं आहे.


ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहा


भारतात वाढत्या डिजिटलायझेशनमुळं, ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आजकाल, अनेक सायबर गुन्हेगार लोकांना विविध बनावट सरकारी योजनांचे आमिष दाखवून फसवतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती वापरून बँकिंग फसवणूक करतात. याशिवाय वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली पैसेही घेतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही सरकारी योजनेच्या दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी, एकदा सरकारी वेबसाइटला भेट द्या आणि योजनेची माहिती मिळवा.


महत्त्वाच्या बातम्या:


वडील आणि मुलगा दोघेही PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? काय आहे नियम?