Parbhani News : परभणीत (Parbhani) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निधीवरुन मोठा वाद उभा राहिला आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे शिंदे गटाच्या नेत्यांना डावलून भाजप आणि विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना अधिकचा निधी देत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार देखील केली होती. दरम्यान, यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंतांना मोठा धक्का दिला आहे. सावंत यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. 


पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांच्याच शिवसेनेचे नेते उभे राहिले असून, पक्षाचा पालकमंत्री असताना शिवसेनेला वगळून विरोधी पक्षांसह भाजपला सर्वाधिक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. 


तानाजी सावंतांना मोठा धक्का


दरम्यान, परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या 149 कामांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रेक लावलाय. सावंतांनी मंजूर केलेल्या कामांवर त्यांच्याच शिवसेनेतील स्थानिक नेत्यांचा तीव्र आक्षेप होता. याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना फोनवरून हे काम काही दिवस थांबवण्याचे आदेश दिले आहे. तसेच यावर तोडगा काढू असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती स्वतः जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. त्यामुळे नुकत्याच 150 कोटींची मंजूर झालेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने पालकमंत्री तानाजी सावंतांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.


काय आहे प्रकरण? 


परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच डॉ. तानाजी सावंत हे पालकमंत्री आहेत. सावंतांनी मागच्या आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या 150 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. ज्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना हा निधी वाटप करण्यात आला. ज्या कामांना मंजुरी देण्यात आली त्याच्या याद्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. मात्र एवढा मोठा निधी देत असताना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्याच पक्षावर अन्याय केल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांच्यासह इतर नेत्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन थेट पालकमंत्री यांनी या निधी वाटपात स्वतःच्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच या 150 कोटींच्या निधी वाटपाला स्थगिती देण्याची मागणी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


शिवसेनेचे पालकमंत्री असूनही निधी मिळत नसल्याने शिंदे गटात संघर्ष; भाजपचीच सर्वाधिक कामे