Parbhani News : महाविकास आघाडीची सत्ता असताना शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 पेक्षा आमदारांनी बंडखोरीचा निर्णय घेतला. वेगळा गट करुन बंडखोर आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी देखील झाले. मात्र आता भाजपसोबत सत्तेत असताना देखील पुन्हा शिवसेनेच्या (शिंदे गट) गटाला निधी मिळत नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचाच पालकमंत्री असताना देखील भाजप आणि विरोधी पक्षातील नेत्यांना शिंदे गटापेक्षा अधिक निधी दिला जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या नेत्याने केल्याने परभणी (Parbhani) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निधीवरुन मोठा वाद उभा राहिला आहे. पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरोधात त्यांच्याच शिवसेनेचे नेते उभे राहिले असून, पक्षाचा पालकमंत्री असताना शिवसेनेला वगळून विरोधी पक्षांसह भाजपला सर्वाधिक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या 150 कोटींच्या कामांना स्थगिती देण्याची मागणी त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे येत्या काळात पालकमंत्री डॉ तानाजी सावंत आणि त्यांच्याच शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.


परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच डॉ. तानाजी सावंत हे पालकमंत्री आहेत. सावंतांनी मागच्या आठवड्यात जिल्हा नियोजन समितीच्या 150 कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली. ज्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना हा निधी वाटप करण्यात आला. ज्या कामांना मंजुरी देण्यात आली त्याच्या याद्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या. मात्र एवढा मोठा निधी देत असताना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्याच पक्षावर अन्याय केल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांच्यासह इतर नेत्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन थेट पालकमंत्री यांनी या निधी वाटपात स्वतःच्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप केला आहे. तसेच या 150 कोटींच्या निधी वाटपाला स्थगिती देण्याची मागणी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. 


मुख्यमंत्री काय तोडगा काढणार? 


शिंदे गटातील नेत्यांनी थेट स्वतःच्याच पालकमंत्र्यांविरोधात शड्डू ठोकल्याने येत्या काळात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील नेते आणि पालकमंत्री यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. मात्र यावर आता मुख्यमंत्री काय तोडगा काढतात याकडे सर्व शिवसेनेच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात शिंदे गटाच्या या संघर्षाची जोरदार चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


CM Eknath Shinde Delhi Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना, भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता