Parbhani District Central Cooperative Bank Scam : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पतसंस्थेत घोटाळ्याचा बातम्या समोर येत आहेत.आता परभणी (Parbhani) जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठा घोटाळा (Scam) झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सन 2020-21 मध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 1 कोटी 96 लाखांचा अपहार झाल्याची गंभीर बाब लेखापरीक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेच्या तत्कालीन 73 बँक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस देण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याबाबत बँकेचे कोणतेही अधिकारी अधिकृतरीत्या बोलयला तयार नसल्याने, खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 


परभणी जिल्हा बँके अंतर्गत असलेल्या तत्कालीन अधिकारी, कर्मचारी, तालुका तपासणीस आणि अंतर्गत तपासणीस यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळ बँकेच्या एकूण 1 कोटी 96 लाख 90 हजार 444 रुपयांचा अपहार झाल्याचे विशेष लेखापरीक्षणात आढळून आले आहे. या रक्कमेबाबत नियमबाह्य कामकाज करुन केलेल्या व्यवहाराची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी विभागीय सहनिबंधक औरंगाबाद यांच्या कार्यालयाने तत्कालीन सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. कदम हे प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर सेलूतील सहाय्यक निबंधक एम.यू. यादव यांची प्राधीकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यादव यांनी केलेल्या चौकशीतून बँकेचे तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांनी बँकेचे व्यवहार चालवितांना बँकेच्या निधीचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. 


लेखापरीक्षणात नेमकं काय आढळून आले? 



  • खातेदारांच्या बचत खात्यातील जमा बाकी पेक्षा जादा रक्कमा काढण्यात आले.

  • वैयक्तिक बचत खाते हे जनरल लेझरशी जुळलेच नाही.

  • बँकेद्वारे बाकी जुवळणीसुध्दा प्रलंबित ठेवण्यात आली.

  • बँकेमार्फत शाखांची तालुका तपासणीस, अंतर्गत तपासणीस योग्य पद्धतीने झाली नाही.

  • शाखांची नियमित तपासणी झाली नाही,  बँक शाखेच्या बॅलेन्सची नियमितपणे पडताळणी करण्यात आली नाही, काही शाखांमध्ये खातेदारांचे सहीचे नमूने उपलब्ध नसतांना देखील इतर बाबींद्वारे रक्कमेचा अपहार करण्यात आला.

  • गैरव्यवहार झाला असून, अधिकारी, कर्मचार्‍यांच्या नियमबाह्य वर्तनामुळेच बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे निष्पन्न होत आहे. 


तत्कालीन 73 बँक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 1 कोटी 96 लाख 90 हजार 444 रुपयांचा अपहार झाल्याने खळबळ उडाली. बँकेच्या लेखापरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. दरम्यान बँक प्रशासनाने या घटनेला गंभीरपणे घेत याची चौकशी सुरु केली आहे. ज्यात एकूण 73 सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांची प्रत्यक्षात चौकशी देखील केली जाण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


शिवसेनेचे पालकमंत्री असूनही निधी मिळत नसल्याने शिंदे गटात संघर्ष; भाजपचीच सर्वाधिक कामे