परभणी : जिल्ह्यात पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या (Heavy Rain) निकषाबाहेरील पावसामुळे (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सन 2022 च्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आता 3 लाख 90 हजार 758 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये रविवारपर्यंत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा धुमधडाक्यात होणार आहे. 


परभणी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश दिले आहे. या निधीची मागणी अ, ब, क, आणि ड अशा चार अहवालानुसार शासनाच्या महसूल व वन विभागाकडे (मदत व पुनर्वसन) करण्यात आली होती. सर्व तहसीलदारांनी शेतकरी आणि त्यांच्या नावापुढील रक्कमेची यादी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी व तसा अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 


शेतकऱ्यांना दिलासा...


गेल्यावर्षी 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. मात्र, अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळू शकली नव्हती. त्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. खरीप हंगाम हातून गेला असून, दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने रब्बी देखील हातून जाण्याची शक्यता आहे. अशातच 2022 मध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आता 3 लाख 90 हजार 758  शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात मिळणारी ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. 


15 ऑक्टोबरपर्यंत नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर...


सन 2022 मध्ये परभणी जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून नुकसानभरपाई मिळणार आहे. ज्यात जिल्ह्यातील 3 लाख 90 हजार 758 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये जमा केले जाणार आहे. तर, रविवारपर्यंत म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


चिंता वाढणार! मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी 29 तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्मा पाऊस