Parbhani Crime : गावातील महिलेला उपसरपंच पदाचा राजीनामा दे म्हणत सरपंच (Sarpanch) आणि त्यांच्या कुटुंबियांकडून झालेल्या मारहाणीत उपसरपंच (Deputy Sarpanch) महिलेच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या (Parbhani) सेलुतील ब्राह्मणगाव इथे घडली आहे. या प्रकरणी सरपंचांसह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


उपसरपंचपदाच्या राजीनाम्यावरुन हाणामारी, तरुणाचा मृत्यू


परभणीच्या सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव इथल्या उपसरपंच शशिकला कांबळे यांच्या घरी 5 ऑगस्ट रोजी गावच्या सरपंच साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे,महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे हे सर्व जण आले आणि तुम्ही उपसरपंच पदाचा राजीनामा द्या असे म्हणत जोरदार वाद घातला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि सरपंच साधना डोईफोडे यांच्या गटाकडून कांबळे यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत उपसरपंच शशिकला कांबळे यांचा मुलगा निखिल कांबळे या रॉडने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रविवारी (6 ऑगस्ट) रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या निखिल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.


सरपंचासह पाच जणांना अटक


या प्रकरणी शशिकला कांबळे यांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरुन सरपंच साधना डोईफोडे,केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे यांच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा


Parbhani Crime: फुल्ल टू 'फर्जी' स्टाईल; पठ्ठ्याने प्रिंटरवर छापल्या 200 च्या बनावट नोटा, पोलिसांकडून अटक