Shasan Aplya Dari : मागील काही दिवसांपासून सरकारकडून 'शासन आपल्या दारी' ही योजना राबवली जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (12 ऑगस्ट) रोजी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमाचे परभणी जिल्ह्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे 12 ऑगस्ट रोजी शिंदे परभणी दौऱ्यावर असणार आहे. 


परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संबंधित चर्चा करण्यात आली. 


75 हजार लाभार्थ्यांना मिळणार...


परभणी येथे येत्या 12 ऑगस्ट रोजी 'शासन आपल्या दारी' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, या अभियानांतर्गंत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्याचा या कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे या अभियानात जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले. 


प्रशासकीय यंत्रणांना सूचना...


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण जिल्हा संनियंत्रण समितीतील विभाग प्रमुखांनी योग्य समन्वय ठेवून जबाबदारी पार पाडावी. पोलीस विभागाने सुरक्षा व्यवस्था अगदी चोख ठेवावी. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंचांना बोलावण्यात येणार असून, मुख्यमंत्री शिंदे हे सरपंच आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी विविध विभाग राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी संबंधित विभागाने करावी. पोलीस यंत्रणेच्या चोख सुरक्षेसोबतच महावितरणकडून अखंड वीज पुरवठा सुरू राहील, याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना जिलहाधिकारी गावडे यांनी दिल्या. 


लाभार्थ्यांना येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध करून देणार...


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि प्रमाणपत्रांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी आग प्रतिबंधक यंत्रणा, स्टेजवरील मुबलक जागा, मान्यवरांची राजशिष्टाचारानुसार बैठकव्यवस्था, माध्यम प्रतिनिधींची आसनव्यवस्था याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे राहुल देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा यंत्रणेच्या विभागप्रमुखांना दिल्या.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Gaothan Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; 'या' जमिनीवरील 2011 च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार, हजारो कुटुंबांना दिलासा