Parbhani Crime News: सध्या बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची 'फर्जी' ही वेब सीरिज भलतीच चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये (Web Series) शाहीद कपूर आपल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये (Printing Press) बनावट नोटा डिझाईन करुन प्रिंट करतो, असं दाखवण्यात आलं आहे. असाच काहीसा प्रकार परभणीतील एका तरुणाने केला आहे. परभणीतील (Parbhani News) एका 19 वर्षांच्या तरुणाने 200 रुपयांच्या बनावट नोटा (Counterfeit Notes) प्रिंटरवर छापल्या आहेत. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर, कागद इत्यादी साहित्य जप्त केलं आहे. 


अवैध धंद्याच्या अनुषंगाने परभणीच्या मानवतमध्ये (Manwath) स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक पेट्रोलिंग करत होतं. तेवढ्यात त्यांना एक माहिती मिळाली. मानवत शहरामध्ये एकजण बनावट नोटा तयार करत असल्याचं पोलिसांना कळालं. पोलिसांनी तात्काळ वेळ न दडवता तातडीने सूत्र हलवण्यास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांना समक्ष घेऊन खंडोबा रोड मानवत या ठिकाणी असलेल्या एका घरात छापा टाकला. या घरामध्ये असलेल्या 19 वर्षीय विशाल संतोष खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची झाडाझडती घेऊन विचारपूस करण्यात आली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तरुणाकडून 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 


200 रुपयांच्या 30 बनावट नोटा


19 वर्षीय विशाल खरातकडे एकाच क्रमांकाच्या 27 नोटा आढळून आल्या. तर दुसऱ्या क्रमांकाच्या दोन नोटा आणि तिसऱ्या क्रमांकाची एक नोट अशा एकूण 30 नोटा आढळून आल्या. या सर्व नोटा 200 रुपयांच्या होत्या. विशालकडून सर्वच्या सर्व बनावट नोटा आणि नोटा छापण्यासाठी विशाल वापरत असलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. 


दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


पिक्समा कंपनीचे जी 2010 प्रिंटर, रिफील इंक वाय असलेली पिवळ्या रंगाच्या लिक्विड करता वापरलेली प्लास्टिक बॉटल, हिरवी, सिल्वर, पोपटी आणि गुलाबी रंगाची चिकटपट्टी, नटराज कंपनीचे पांढरे पेपर, 115 पांढऱ्या रंगाचे पेपर ज्यावर दोन्ही बाजूनं 200 च्या छापलेल्या बनावट नोटा आदी विविध कंपन्यांचे पांढरे पेपर असा एकूण 10 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचं पोलीस नाईक दिलावर खान रशीद खान पठाण यांच्या फिर्यादीवरुन विशाल संतोष खरात या तरुणाविरोधात मानवत पोलीस ठाण्यात कलम 420, 489(अ), 489(क), 489(ड) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


धक्कादायक! परभणीत तेरा वर्षाच्या मुलीचा 40 वर्षाच्या व्यक्तीसोबत विवाह, पालकांसह 13 जणांवर गुन्हा