परभणी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर विविध प्रकारची आंदोलनं सुरू आहेत. मात्र यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीलाही (Gram Panchayat Election) मराठा आरक्षणाचा फटका बसताना दिसून येतोय. परभणीतील वझुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि संरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या गावची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. 


परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंच आणि 11 ग्राम पंचायत सदस्य अशा 12 जागांसाठी या निवडणुकीत एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातले तीन सरपंच पदासाठी तर 31 ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अर्ज होते. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार करत इथल्या सर्वच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले.


दुसरीकडे पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होती. तिथेही चार जणांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या चारही जणांनी आज आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत निवडणूक होणार नाही असा निर्धार या गावकऱ्यांनी केला. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणच्या निवडणूक आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे.


येवला तालुक्यातील 10 गावांत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण 


मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नाशिकच्या येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव, खामगाव, देवठाण, भुलेगाव ,पिपळखुटे, धुळगावसह जवळपास आठ ते दहा गावातील नागरिकांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे गावातून रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत आमरण उपोषणास यावेळी ग्रामस्थांनी सुरुवात केली आहे. या गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचंही सांगितलं आहे. 


पंढरपुरात सर्वपक्षीय राजकारण्यांना नो एन्ट्री


आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्व आमदार खासदार विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल.विविध पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.


मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदार राज्यात संवेदनशील होऊन गेला आहे. राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा वाढत चालला आहे. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून अनेक जिल्ह्यात सर्वपक्षीय नो एन्ट्री सुरु झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशा आशयाचे फलक गावाच्या चौका चौकात लागलेले आहेत. लातूर जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये असे फलक दिसून येत आहेत. 


ही बातमी वाचा: