परभणी: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय राज्यभर पेटला असताना आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी परभणीच्या (Parbhani) पाथरी तालुक्यातील वडी येथे 28 वर्षे तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हा विषय आता वेगळं स्वरूप धारण करतोय की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


परभणीच्या पाथरी तालुक्यातील वडी येथील रहिवाशी असलेला सोमेश्वर उत्तमराव शिंदे हा 28 वर्षे तरुण सालगड्याचे काम करत होता. घरी हलाखीची परिस्थिती होती. त्यातच आज दुपारी त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एक चिट्ठी सापडली. त्या चिठ्ठीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं त्याने म्हटलं आहे. तसेच सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केल्याचा मजकूर त्याने चिठ्ठीत लिहून ठेवलेला होता. घटना कळताच मोठ्या प्रमाणावर मराठा समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच समाज बांधव घटनास्थळी दाखल झाले होते.


दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या 24 तासांमध्ये तीन तरूणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.


नांदेडमध्ये एका तरूणाची आत्महत्या 


नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आरक्षणसाठी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे.  मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असा उल्लेख चिठ्ठीमध्ये उल्लेख केला आहे.


मराठा आरक्षणासाठी आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप मराठा संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. भोपाळ (ता.नायगाव) येथील ओमकार आनंदराव बावणे (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओमकारने रविवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी गावाशेजारील जंगली पीरजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मृत्यूपूर्वी ओमकारने विहिरीवर चिठ्ठी लिहून ठेवली होती.


विहिरीवर लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये 'माझे आई वडिल मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवतत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे' असा चिठ्ठीमध्ये उल्लेख केला आहे. आरक्षणप्रश्नी एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली अजून याचा समाजातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. दरम्यान मराठा संघनेतर्फे घोषणाबाजी देखील करण्यात आली. 


ही बातमी वाचा: