Abdaul Sattar: राजकीय नेत्यांचा शाही थाट काही नवीन नाही. त्यामुळे नेत्यांच्या दौऱ्यात असे शाही थाट अनेकदा पाहायला मिळतात. विशेष म्हणजे नेत्यांच्या दौऱ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून देखील अशी सोय केली जाते. आता असाच काही प्रकार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या परभणीच्या दौऱ्यात पाहायला मिळाला आहे. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीबाबत आढावा बैठकीत सत्तार यांच्यासाठी चक्क काजू-बदामची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आता यावरून सत्तार यांच्यावर टीका केली जात आहे. 


2017 मध्ये महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचारासाठी उस्मानाबादच्या येणेगुरमध्ये पोहचलेल्या काँग्रेस नेत्यांच्या जेवणासाठी चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या ताट-वाट्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता आणि काँग्रेस नेत्यांवर टीका देखील झाली होती. आता पुन्हा एकदा असाच शाही थाट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाहायला मिळाला आहे. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीबाबत आढावा बैठकीत सत्तार यांच्यासाठी चक्क काजू-बदाम ठेवण्यात आले होते. आज शेतकरी एवढ्या मोठ्या संकटात असताना मंत्री मात्र बैठकीत काजू-बदामवर ताव मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील नुकसानीबाबत झालेल्या आढावा बैठकीचे काही फोटो ट्वीटवरून शेअर केले आहेत. ज्यात अब्दुल सत्तार आणि अधिकाऱ्यांच्या समोर प्लेटमध्ये काजू बदाम ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी काटकर, उपजिल्हाधिकारी अरुण जरार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 






अब्दूल सत्तारांची प्रतिक्रिया...


विशेष म्हणजे हिंगोली येथे देखील जिल्हा नियोजन बैठकीत सत्तार यांचा असाच शाही थाट पाहायला मिळाला. हिंगोलीत सत्तार यांच्यासाठी काजू, बदाम आणि पिस्ता ठेवण्यात आला होता. त्यामुळे याबाबत 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, टेबलवर काजू बदाम ठेवले असतील, मात्र ते मी खाल्ले नाही. पालकमंत्री पहिल्यांदा आल्यावर अशाप्रकारे काजू, बदाम ठेवले जातात असे म्हणत सत्तार यांनी वेळ मारून नेली. 


अब्दुल सत्तार यांचं वादग्रस्त वक्तव्य, जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं दारु पिता का?