Panvel Crime : पनवेलमधील (Panvel) तावरवाडी या आदिवासी पाड्यावरील तरुणाने आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार (20 जानेवारी) रात्रीपासून या आदिवासी वाडीतील 16 वर्षांची अल्पवयीन मुलगी आणि 20 वर्षांचा तरुण बेपत्ता होता. अखेर शनिवारी (21 जानेवारी) पहाटे जवळच्याच जंगलामध्ये (Jungle) दोघे बेशुद्धावस्थेत आढळले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी दोघांनीही प्राण सोडले. दोघांनी विषारी द्रव्ये (Poison) पिऊन आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु ते नात्यात होते. त्यामुळे कुटुंबीय आपल्या लग्नाला मान्यता देणार नाही, असं वाटल्याने या प्रेमीयुगुलाने (Couple) टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


शनिवारी पहाटे मुलीचा आईला कॉल आणि विष प्यायल्याची माहिती


मित्राच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी जात असल्याचं सांगत दोघेही शुक्रवारी (20 जानेवारी) रात्री घरातून बाहेर पडले. परंतु बराच वेळ झाल्यानंतरही दोघेही घरी परत न आल्याने पालकांनी फोन करुन त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर शनिवारी (21 जानेवारी) पहाटे तीनच्या सुमारास, मुलीने तरुणाच्या फोनवरुन तिच्या आईला कॉल केला आणि आपण कीटकनाशक घेतले असून दोघेही त्यांच्या घरापासून सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या जंगलात आहेत. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला आणि सुमारे दोन तास शोध घेतल्यानंतर दोघेही एका निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत आढळले.


नात्यातील असल्याने कुटुंबीय लग्नाला मान्यत देणार नाहीत असं वाटून आत्महत्या


"जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना ते सापडले तेव्हा दोघेही जिवंत होते आणि त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती कुटुंबियांना नसावी. पण तरुण आणि तरुणी नात्यातील असल्याने लग्न होऊ शकत नाहीत याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा. अधिक तपशीलासाठी आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत," असं पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितलं.


...तर कदाचित दोघांचा जीव वाचला असता : पोलीस


त्यांच्या कुटुंबीयांना दोघेही आधी सापडले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचवता आला असता, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांना कीटकनाशकाची बाटली सापडली.


हेही वाचा


Panvel Crime : उड्डणपुलाखाली आढळलेल्या तरुणीच्या मृत्युचा उलगडा, चपलेवरुन मारेकऱ्यांचा सुगावा