Jammu Kashmir : जम्मू- काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराने ( Security Forces) जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला ( Hizbul Mujahideen Terrorist) अटक केलीय. नासिर अहमद शेर गोजरी उर्फ ​​कासिम भाई असे अटक केलेल्या या दहशतवाद्याचे नाव आहे.  2017 पासून नासिह सक्रिय होता. तेव्हापासून तो विविध गुन्हेगारी प्रकरणात सहभागी होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय. याबरोबरच याबाबतचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.    






जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचा समुळ नष्ट करण्यासाठी सुरक्षा दल नेहमीच कार्यरत असते. तरी देखील येथे दहशतवादी हल्लेही होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील इदगाह भागात नुकताच हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमध्ये एजाज अहमद देवा नावाचा एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.  


श्रीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या घटनेशिवाय जम्मू शहराच्या बाहेरील एका गजबजलेल्या भागात शनिवारी दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. 


Jammu Kashmir :  एनआयएची घटनास्थळी भेट 


काँग्रेसची भारत जोडो यात्रा आणि आगामी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर या भागातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असताना हे स्फोट झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने रविवारी सकाळी स्फोट झालेल्या ठिकाणांना भेट दिली असून फेडरल अँटी टेरर एजन्सी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. 


एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नरवाल भागात दोन वाहनांमध्ये शनिवारी स्फोट झाले. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून पोलीस कर्मचारी आणि सैन्य दलाकडून तपासणी आणि चौकशी करण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या


Jammu Terrorist Attack : जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला; नरवाल भागात दोन स्फोट, 6 जण जखमी