Panvel Crime : पनवेल (Panvel) तालुक्यातील धामणी (Dhamani) गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आढळलेल्या तरुणीच्या मृत्युचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आले आहे. मृत तरुणीच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपलेवरुन (Footwear) पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. रियाज खान (वय 36 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. तर उर्वशी वैष्णव (वय 27 वर्षे) असं मृत तरुणीचं नाव आहे.


धामणी गावाजवळील उड्डाणपुलाखालील गांधी नदीपात्रात 15 डिसेंबर रोजी एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. महिलेची ओळख पटेल असं कोणताही पुरावा सापडला नाही. परंतु मृत महिलेने घातलेल्या स्थानिक फुटवेअर बॅण्डेमुळे मारेकऱ्यांचा शोध घेण्यास मदत झाली. उर्वशी वैष्णवच्या कुटुंबियांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यातच उड्डाणपुलाजवळील मृतदेह सापडला होता. हा मृतदेह वैष्णवीचाच असल्याचं समोर आलं. परंतु तिने घातलेल्या चपलेच्या ब्रॅण्डमुळे पोलिसांना तिच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता आलं.


स्थानिक ब्रॅण्डच्या चपलेवरुन आरोपीचा सुगावा


तरुणीने घातलेल्या ब्रॅण्डची चप्पल कुठे भेटते, त्या दुकानाची माहिती पोलिसांनी काढली. पोलिसांनी त्या दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित तरुणी एका तरुणासोबत दिसली. तरुणाविषयी अधिक तपास केला असता तो बॉडी बिल्डर असल्याचं निदर्शनास आलं. यावरुन सर्व जिममध्ये माहिती घेतली असता घणसोली इथल्या एका जिममध्ये आरोपी ट्रेनर म्हणून काम करत असल्याचे समोर आलं. तसंच आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरुन त्याच्या साथीदाराचा देखील सुगावा लागला. मुख्य आरोपी रियाज खान आणि सहआरोपी इम्रान शेख याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत मृत तरुणीचं नाव उर्वशी वैष्णव असून ती नेरुळ येथील एका बारमध्ये कामाला होती, ही माहिती समोर आली. 


दोन लग्न झालेल्या रियाजकडे उर्वशीकडून लग्नाचा तगादा


उर्वशी वैष्णवचे मुख्य आरोपी रियाज खानसोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. नेरुळमधील एका बारमध्ये त्यांची ओळख झाली होती. उर्वशी वैष्णव ही कोपरखैरणे इथे आई आणि भावासोबत राहत होती. महत्त्वाचं म्हणजे रियाज खानचं याधी दोन लग्न झाली होती. पहिल्या पत्नीपासून तो विभक्त झाला होता. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला दीड वर्षांची मुलगी असून तो त्यांच्यासोबत देवनार इथे राहत होता. उर्वशी त्याच्याकडे वारंवार लग्नाचा तगादा लावत होती. परंतु त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. उर्वशीच्या तगाद्यामुळे तो चिडला होता. त्यामुळे रियाजने मित्राच्या साथीने उर्वशीला संपवण्याचं ठरवलं. 


कारमध्ये दोरीने गळा आवळून उर्वशीला संपवलं


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबरच्या रात्री रियाज खानने उर्वशीला कामावर सोडण्याच्या बहाण्याने कोपरखैरणे इथल्या राहत्या घरातून सोबत घेतलं. वाटेत रियाजने कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा त्याचा मित्र इम्रान शेख (वय 28 वर्षे) यालाही आपल्यासोबत घेतलं. दोघांनी कारमध्ये दोरीने गळा आवळून उर्वशीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पनवेलमधल्या धामणी गावाजवळील उड्डाणपुलाखाली फेकून दिला. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.


"रियाज खान आणि उर्वशी अनेकदा पनवेलमध्ये नदीच्या कडेला वेळ घालवायचे आणि त्यामुळे त्याला ती जागा चांगलीच माहित होती. या भागात फारसे लोक येत नाहीत. शिवाय रस्त्यावर कमी पथदिवे असल्याची कल्पना त्याला होती. त्यामुळे धामणी गावात जाऊन मृतदेह गांधी नदीवरील पुलावरुन फेकून दिला," अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.