Plaghar Rain Updates : राज्यभरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून अनेक शहरांत आज अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. पालघरमध्येही मुसळधार (Palghar Rain Updates) पावसानं हाहाकार माजवला आहे. पालघरमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच पालघरमधील वैतरणा नदीत बहाडोली येथे 13 कामगार अडकले आहेत. मुंबई वडोदरा महामार्गाच्या पुलाचं काम सुरू असताना अचानक पूर आल्यानं हे कामगार नदी पात्रात अडकल्याची माहिती मिळत आहे.  सध्या पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं आहे. आतापर्यंत 6 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. 


पालघरच्या वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरात 13 कामगार अडकले आहेत. मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्यानं ते आडकून पडले आहेत. हे सर्व कामगार गेल्या 15 तासांपासून अडकून पडले असून ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी 6 जणांना वाचवण्यात यश आलं असून इतर कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफकडून या सर्व कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


दरम्यान, राज्यातल्या 4 जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, पालघर, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा तर मुंबई, ठाण्याला ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे  ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, मुंबईच्या शाळांबाबत निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :