Mumbai University Exams Cancelled : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षांना आजपासून सुरुवात होणार होती. परंतु, अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं विद्यापीठाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आज मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 


हवामान विभागाकडून आज मुंबईत (Mumbai Rain Update) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनंही नागरिकांना प्रशासनाकडून केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, शाळांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 


मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठानं आज, गुरुवार 14 जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येतील, असंही विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. आज मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा होणार होत्या. त्याचबरोबर आज होणाऱ्या इतर परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. 


मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळाबद्दल 


आपात्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत काल शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक काढलं होतं. मुंबईतील स्थानिक परिस्थिती पाहून आज सुट्टी देण्याबाबत सक्षम प्राधिकरण यांनी निर्णय घ्यावा, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई विभागात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला आहे.


आपत्तीच्या पूर्व सूचनेवरून, हवामान खात्याचा अंदाजारून तसेच त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा आणि त्या अनुषंगानं स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलं आहे. 


ठाण्यात शाळांना सुट्टी


ठाण्यामधील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांना 14 आणि 15 जुलै रोजी दोन दिवसांची सुटी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.