पालघर: पालघरमधील बोईसर चिल्हार महामार्गावरील  (Palghar Boisar Chillar) खैरा फाटक येथील रेल्वेच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात (Accident)  झाला आहे. या अपघातात एका पाच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खड्डा चुकवताना अवजड ट्रकची बुलेटला धडक लागून ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बुलेटवरील पती-पत्नी जखमी असून त्यांच्यावर बोईसरमधील अधिकारी लाईफ लाईन या रुग्णालयात उपचार सुरू आहेत . 


बोईसरमधील शिवाजीनगर येथे राहणारे दांपत्य आपल्या पाच वर्षाच्या मुलासह बुलेटवरून बोईसर पूर्वेस असलेल्या डी मार्ट येथे दिवाळीच साहित्य खरेदी करण्यासाठी जात होते. मात्र बोईसर खैरा फाटक येथील रेल्वेच्या उड्डाणपुलावर त्यांच्यावर काळाने घाळा घातला. बोईसर खैरा फाटक येथील पुलावर असलेले खड्डे चुकवताना बुलेट आणि अवजड वाहनाची धडक झाली. यात बोईसर औद्योगिक क्षेत्रातून वायरचे बंडल घेऊन निघालेल्या अवजड ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने चिमुरड्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


बोईसर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असला तरी ट्रकचालक ट्रक घटनास्थळीच सोडून फरार झाला आहे . बोईसर चिल्हार हा मार्ग एमआयडीसीकडे असून या मार्गावर आजही अनेक त्रुटी आहेत. अनेक ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र असून देखील एमआयडीसी बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतंय.  या मार्गावर सध्या असलेलं खड्ड्यांच साम्राज्य, अनेक धोकादायक वळण ,  दुभाजकांची कमतरता ,अनेक ठिकाणी तीन लेनच्या अचानक होणाऱ्या दोन लेन यामुळे या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.  मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रमुख मार्गाच काम अजूनही अपूर्ण आहे . त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असून या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्वही आले आहे.


  मात्र बोईसर तारापूर एमआयडीसी बांधकाम विभाग या मार्गाचा ठेका असलेल्या कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही . त्यामुळे कंत्राटदारासह एमआयडीसी बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून महाराष्ट्र बॉर्डरवरील अछाड ते घोडबंदर अशा 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 ब्लॅक स्पॉट असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. 2014-15 मध्ये याच ब्लॅक स्पॉटची संख्या साधारण 82 होती. त्यानंतर ती कमी होऊन 29 वर आली. मात्र अजूनही अपघातांच्या संख्येमध्ये कमी होताना दिसून येत नाही. वर्षभरात साधारणत: चारशेच्या आसपास बळी गेल्याची माहिती येथील जाणकारांनी दिली आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या :


High Court: अपघातात अंपगत्व आलेल्या व्यक्तीला एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई; हायकोर्टाचे आदेश