ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाजी (ISSF World Championships) स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटीलला (Rudranksh Patil) रोख 2 कोटी रुपये देण्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं आहे. तसेच, राज्य मंत्रिमंडळाकडून त्याचं अभिनंदन करण्यात आलं आहे. 


आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रुद्रांक्षचं अभिनंदन केलं आहे. तसेच, राज्य मंत्रिमंडळानंही त्याच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे. 


कैरो (Cairo) येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेतील दहा मीटर रायफल्स स्पर्धेत भारताचा नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांनं वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. त्याबद्दल आज बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी रुद्रांक्ष पाटीलनं केलेल्या कामगिरीची माहिती दिली. 2024 ला फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक  स्पर्धेचा पहिला कोटा त्याला मिळाला आहे. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यानं ही कामगिरी केली आहे. 


कोण आहे रुद्रांक्ष पाटील? 


पालघरचा रुद्रांक्ष पाटील हा भारताचा आतापर्यंतचा सहावा विश्वविजेता नेमबाज आहे. आतापर्यंत नेमबाजीत फक्त अभिनव बिंद्रानं ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. रुद्रांक्षच्या सुवर्ण कामगिरीमुळे त्याला 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिकीट मिळालं आहे. रुद्रांक्ष हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा मोठा मुलगा आहे. त्याची आई हेमांगिनी या नवी मुंबईतील वाशी येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळं त्याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यानं ही कामगिरी केली आहे. 


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला सुवर्णपदक 


रुद्रांक्ष पाटीलनं शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. त्यानं पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांक्ष पाटीलनं शुक्रवारी 36व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्यानं पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.