Mumbai News: रस्ते अपघातात गंभीर जखमी झाल्याने अंपगत्व आलेल्या पीडित व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. गंभीर अपघातामुळे आलेलं कायमचं अपंगत्व (Disability in Accident) आणि त्यामुळे सहन करावा लागत असलेला संसारिक, शारीरिक आणि मानसिक त्रास पाहता पीडित व्यक्तीच्या नुकसान भरपाईत वाढ होणं गरजेचं आहे, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाने 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई ( compensation for victim) देण्याचे निर्देश दिले आहेत. 


प्रकरण काय?


धातू कापणीचं काम करणारे याचिकाकर्ते योगेश पांचाळ हे 29 नोव्हेंबर 2004 रोजी दुचाकीवरून मुलुंडमधील सोनापूर बस स्थानकाजवळून जात असताना मागून येणाऱ्या एका डंपरनं त्यांना धडक दिली होती. या अपघातात गंभीर झालेल्या पांचाळ यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यांना कायमचं अपंगत्त्व आले. या अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी पांचाळ यांनी मोटार वाहन अपघात दावा लवादाकडे अर्ज केला. लवादाने त्यांना 48 लाख रुपयांची नुकसान भरपाई 7.5 टक्के व्याजानं देण्याचे निर्देश दिले. मात्र, पांचाळ यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्यानं या निर्णयावर असमाधान व्यक्त करत पांचाळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात भरपाईची रक्कम वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.


हायकोर्टाचा निकाल काय?


न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर यावर नुकतीच सुनावणी पार पडली. पांचाळ यांची बाजू ऐकून घेतली. या गंभीर अपघातामुळे याचिकाकर्त्यांचं वैयक्तिक आयुष्यात संपूर्णतः बदललं असून त्यांचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग निकामी झाला आहे. तसेच त्यांच्या शारीरिक, मानसिक त्रासाचा त्यांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम झाला आहे. पिता म्हणून मुलांच्याप्रती असलेल्या जबाबदाऱ्या, प्रेम, मार्गदर्शनावर अनेक मर्यादा आल्या आहेत. आर्थिक भरपाईचा आकडा जरी लाखोंचा असला तरी याचिकाकर्त्यांचे जीवन पूर्ववत होऊ शकणार नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं नुकसानभरपाईच्या रकमेत अतिरिक्त 64 लाख 86 हजार 715 रुपयांची वाढ केली. तसेच येणाऱ्या काळातील वैद्यकीय खर्चाची 23 लाख रुपयांची रक्कम वगळता न्यायालयाने पांचाळ यांची याचिका योग्य ठरवली आणि त्यांना मोठा दिलासा दिला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: