Palghar News : सध्या अंधश्रद्धा आणि त्याच्यावर वाढत चाललेला विश्वास याचे प्रकार आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पुढारलेल्या महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेच्या घटना घडत आहेत. देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, पण दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई लगत असलेल्या पालघर (Palghar) जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा (Superstition) मोठा पगडा पाहायला मिळत आहे. सर्पदंश (Snake Bite) झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तलासरी इथल्या ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे. तलासरी तालुक्यातील करंजगाव येथील सोमा लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयातच एका मांत्रिकाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला, यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखी बिघडली असून त्यांना सध्या दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. थेट रुग्णालयातच अशा पद्धतीने अंधश्रद्धेतून अघोरी विद्येचा प्रयोग झाल्याने रुग्णालय प्रशासनावर ही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे.
आम्ही विरोध केला पण नातेवाईकांनी ऐकलं नाही : रुग्णालय प्रशासन
संबंधित व्यक्तीला काल (8 ऑगस्ट) तीन वाजता सर्पदंश झाला, त्यानंतर त्याला संध्याकाळी सहा वाजता तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याला ब्लीडिंग होत होतं. "आम्ही हा अघोरी प्रकार करु नका असा विरोध केला, मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्याच नातेवाईकांनी हा व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला आहे, असं मत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप भारती यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये अघोरी कृत्याचा प्रकार; आदिवासी तरुणाचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला होता. जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अघोरी विद्येच्या नावाखाली पिंपळकोठे येथील आदिवासी तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवीण गोलचंद सोनवणे असे मृत तरुणाचे नाव असून तुळशीराम सोनवणे असे संशयित भोंदू बाबाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील प्रवीण सोनवणे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आलियाबाद येथील भोंदू बाबाकडे गावठी उपचार करण्यासाठी जात होता. भोंदू बाबाचे ही पिंपळकोठे येथे सोनवणे यांच्या घरी येणे जाणे होते. सोनवणे हा आलियाबाद येथे उपचारासाठी गेला होता, पण बाबाने अघोरीपणा करुन सोनवणे याचा जीव घेत त्याला त्याच घरात टाकून बाहेर निघून गेला होता. सोनवणे घरी न आल्याने त्याचे नातेवाईक शोधू घेऊ लागले. नातेवाईकाने भोंदू बाबास कॉल केला. त्यावेळी त्यांनी प्रवीण बाहेर गेला आहे, झोपला आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. नातेवाईकांना संशय आल्याने याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली असता मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा