Palghar News : पालघर (Palghar) भाजपचे (BJP) नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भरत राजपूत (Bharat Rajput), लहान भाऊ जगदीश राजपूत (Jagdish Rajput) यांच्यासह आणखी दोघांवर डहाणू पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह (Atrocity) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणूतील प्रकाश ठाकरे या आदिवासी समाजातील इसमाला कार्यालयात बोलून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून डहाणू पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. 


कार्यालयात बोलावून मारहाण आणि शिवीगाळ, प्रकाश ठाकरे यांचा आरोप


डहाणू (Dahanu) तालुक्यातील इंटिग्रेट युनिट जवळील नवापाडा, लोणी पाडा येथील राहणारे प्रकाश ठाकरे यांच्या घरी पालघरमधील एका स्थानिक संघटनेचे काही पदाधिकारी या पाड्यातील समस्या जाणून घेण्यासाठी आले होते. मात्र याचाच जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना राग आल्याने त्यांनी प्रकाश ठाकरे यांना फोन करुन कार्यालयात बोलावले. डहाणूतील कार्यालयात जाताच ठाकरे यांना भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, त्यांचे भाऊ जगदीश राजपूत, विशाल नांदल्सकर, राजेश ठाकूर यांनी ठाकरे यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसंच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  


भरत राजपूत यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा


यानंतर प्रकाश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर डहाणू पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह भादंवि कलम 323, 504, 506 (2), 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत राजपूत यांना महिनाभरापूर्वीच पालघरच भाजपने जिल्हाध्यक्ष पद दिलं असून त्यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी देखील भारत राजपूत आणि त्यांचा भाऊ जगदीश राजपूत यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात (Dahanu Police Station) अनेक तक्रारी दाखल झाल्या असून काही गंभीर स्वरुपांच्या तक्रारींचाही समावेश आहे. 


मोर्चाचा इशारा दिल्यानंतर गुन्हा दाखल, तपास सुरु


ठाकरे यांना मारहाण झाल्यानंतर राजपूत हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास डहाणू पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चाचं नियोजन पालघरमधील विविध आदिवासी संघटनांकडून करण्यात येणार असल्याचा इशारा विविध संघटनांनी दिला होता. मात्र अखेर काल (7 ऑगस्ट) रात्री उशिरा राजपूत यांच्यासह आणखी तिघांवर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सध्या डहाणू पोलीस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा


Palghar News: भोग काही सरेनात, नदीवर पूल कोणी बांधेना; मोखाडा तालुक्यातील नागरिकांचा वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास