Palghar News: भ्रष्टाचाराविरोधात कायदा असला तरी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येताना दिसतात. भ्रष्टाचारासाठी अनेकदा विविध मार्ग वापरले जातात. पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील एका गावात असाच एक प्रकार समोर आला आहे. विहिरीचे काम न करताच 82 हजाराच्या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेमध्ये 'पेसा' निधीमधून एक विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र, विहीर जागेवर नसल्याचे म्हटले जात आहे.
उर्से आंबाडी पाडा येथील विहिरीचे काम ग्रामपंचायत पेसा योजनेतून मंजूर होउन या कामासाठी दोन लाख 50 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे काम वाटप होऊन काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करताच एका बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या वाघोबा ट्रान्सपोर्ट नावाच्या खात्यावर ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून 82 हजारांचा धनादेश देण्यात आला.
हा धनादेश कामाचे कंत्राट घेणारी व्यक्ती किंवा एजन्सीच्या नावे देणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या व्यक्तीच्या नावे देण्यात आल्याने यात मोठं गौडबंगाल असल्याचा आरोप केला जात आहे. प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी बांधकाम साहित्य टाकलं गेल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र प्रत्यक्षात जागेवर ना विहिरीचे खोदकाम झाले, ना विहिरीच्या बांधकामासाठी लागणारी साधन सामग्री टाकण्यात आली आहे. 'पेसा' निधीतून आदिवासी नागरिकांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात येणारी विहीर देखील तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने लुटून खाण्याचा हा प्रकार गंभीर असल्याने यात सामील सर्वांची सखोल चौकशी करून फसवणूक केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबाडी पाड्यातील आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकाऱ्यांनी काय म्हटले?
उर्से आंबडी पाडा येथे नवीन विहिरीचे खोदकाम करण्यात आले होते त्यावेळी या ठिकाणी विहीर बांधण्यासाठी लागणारी साधन सामग्री ठेवली होती परंतु आता माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याने सध्या स्थितीमध्ये विहिरच्या कामा संदर्भात माहिती नाही असे उर्से ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. तर, उर्से आंबाडी पाडा येथे ग्रामपंचायत पेसा निधीतून मंजूर विहिरीच्या जागेचे स्थळ पाणी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येणार असल्याचे सध्याचे ग्रामविकास अधिकारी किशोर आक्रे यांनी सांगितले.
उर्से आंबडी पाडा येथे पेसा निधीत गैरव्यवहार झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे . विहीर न बांधता त्या जागेवर फक्त एक ट्रक डब्बर टाकून 80 हजार रुपये लाटला असून आम्ही पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर ठेकेदार व ग्रामविकास अधिकारी यांच्या वर्ती गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असे तक्रारदार आशिष चव्हाण यांनी सांगितले.