लातूर : विहीर चोरीला गेली... हे एखाद्या चित्रपटात ऐकायला आणि पहायला बरे वाटते. मात्र, प्रत्यक्षात तसं प्रकारच रेणापूर तालुक्यातील सुमठाणा येथे घडलं आहे. गावची तहान भागवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विहिरीचे खोदकाम करावे यासाठी मंजुरी मिळाली. सर्वकाही झाले ते फक्त कागदोपत्री. मात्र, ज्या ठिकाणी विहिरीसाठी जागा ठरवून देण्यात आली होती. त्याठिकाणी ना विहीर आहे, ना विहीर खोदण्याची कोणती प्रक्रिया झाली. त्यामुळे विहीर केवळ चित्रपटातच नाही, तर प्रत्यक्षातही चोरीला जाऊ शकते. हा प्रताप गावच्या सरपंचांनी आणि ग्रामसेवकाने दाखवून दिला आहे.



रेणापूर तालुक्यातील सुमठाणा गावच्या पाण्याची स्थिती पाहता, विहीर बांधणीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आला होता. त्याअनुषंगाने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून मंजुरीही मिळाली. या विहिरीकरिता 7 लाखांचा निधीही ग्रामपंचायतीला मिळाला होता. त्यानुसार दोन महिन्यात विहिरीचे काम पूर्ण करायचे होते. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवकांनी अजब कारभार करून विहिरीचे काम पूर्ण असल्याचे दाखविलेले आहे. कामाचे उद्घाटन झालेले नसतानाच मजुरांनी हे काम केले असल्याचे मस्टरवर दाखविण्यात आले आहे. शिवाय
हजेरीपत्रकावर मजुरांच्या तशा स्वाक्षऱ्याही आहेत. पण मजूर कधी कामावर आले नाही, तर विहिरीचे कामही झालेले नाही. 7 लाखांचा अपहार सरपंच आणि ग्रामसेवकाने केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


सध्या कोरोनाच्या काळात मजुरांच्या हाताला काम नाही, तर याच विहिरीचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात जेसीबी आणले आहेत. हा सर्व दिखाऊपणा असला तरी प्रत्यक्षात ना विहीर खोदलेली आहे, ना मजुरांच्या हाताला काम मिळाले. फक्त पदरी पैसा पडला आहे, तो सरपंच आणि ग्रामसेवकाच्या खिशात. असे असतानाही पाहणी न करताच बिल मंजूर झालेच कसे हा प्रश्न कायम आहे.


गावातील तरुण अमर साखरे यांनी याचा अनेक दिवसापासून पाठपुरावा केला आहे. आमच्या गावाचा पानीप्रश्न तसाच आहे. शासकीय कागदपत्रे मात्र येथील पाणीप्रश्न मार्गी लागल्याचे सांगत आहेत. आता आम्ही याच्या विरोधत प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अद्याप दखल घेण्यात आली नाही, असे सांगत आहेत. जानेवारी ते जून या काळात कागदोपत्री विहिरीचे काम झाले असल्याचे दाखवण्यात आले आहे. जर ही विहीर झाली असती तर गावातील मजुरांना लॉकडाऊनमध्ये हाताला काम मिळाले असते, अशी खोटी कामे करणाऱ्या लोकांवर तात्काळ फौजदारी स्वरुपात गुन्हे दाखल करून कडक शासन करावे असे मत दयानेश्वर कोळी यानी व्यक्त केले आहे. तसेच याबाबत तक्रार आमच्या कार्यलयकडे प्राप्त झाली आहे. चौकशिचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीअंती यातील दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मत रेनापूर तालुक्याचे रोजगार हमी योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी काकासाहेब जाधव यांनी व्यक्त केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


अकोल्यातून अपहरण झालेला चिमुकला नागपूरात सापडला; अपहरण करणारी आरोपी महिला अटकेत


सांगोल्यात फॉर्च्युनरपेक्षा महाग मेंढा, पिल्लालाच 10 लाखांची किंमत


धुळ्यात बंजारा जातपंचायतीकडून पाच कुटुंबं बहिष्कृत, गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचांवर अखेर गुन्हा


बजाज ऑटोच्या औरंगाबादमधील प्लांटमध्ये 403 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह; कामगार युनियनचा दावा