Presidential Election 2022 : भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार (Presidential Election 2022) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज मुंबईत प्रचारासाठी येणार आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेने (Shivsena) मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्या मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांची भेट घेणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
आज दुपारी द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल होणार आहेत. यावेळी भाजप नेत्यांकडून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर अंधेरीतल्या लीला हॉटेलमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांसोबत बैठक होणार आहे. यावेळी भाजप खासदारदेखील उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीत जवळपास 250 आमदार-खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्षदेखील या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मातोश्रीवर जाणार?
द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. याआधीच्या राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू यादेखील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का याकडे लक्ष लागले आहे. तूर्तास त्यांचा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, आतापर्यंत शिवसेनेला भाजप अथवा एनडीएकडून या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या बैठकीत शिवसेनेने उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायातून येत असल्याने शिवसेनेने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: