Palghar Rain News Updates : राज्यभर पावसाचा (Maharashtra Rain) धुमाकूळ सुरु आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यात देखील संततधार पाऊस सुरु आहे. अशात पालघरमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.  नदीच्या वाहत्या पाण्याच्या धोकादायक प्रवाहावर टायर मधील ट्यूबच्या साहाय्याने शाळकरी विद्यार्थिनी प्रवास करत असल्याचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. विक्रमगड मधील मलवाडा ग्रामपंचायत हद्दीतील म्हसेपाडा गावातील हे विदारक आणि हृदयाचा ठोका चुकवणारं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.


म्हसेपाडा या गावाला गारगाई आणि राखाडी या दोन्ही नद्या पावसाळ्यात चारही बाजूनी वेढा घालत असून गावात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग या गावातील ग्रामस्थांना नाही. नदीवर एक छोटा बंधारा आहे. त्याची उंची कमी असल्याने तो पावसाळ्यात नेहमीच पाण्याखाली असतो. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना वाहनाच्या टायरमधील ट्यूबचा आधार घेऊन हा काही मीटर अंतराचा जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागतोय. 


गारगाई आणि राखाडी या दोन्ही नद्यांचा प्रवाह अतिशय तीव्र असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक या विद्यार्थ्यांची नदीपत्रातून ट्यूबच्या साहाय्याने ये-जा करण्यासाठी मदत करतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून या गावाला जोडणाऱ्या पुलाची मागणी असताना देखील जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.


पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. तर अनेक ठिकाणचे रस्ते बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर पालघर तालुक्यातील माकुंसार गावांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. भारतीय हवामान विभाग व प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 14 जुलैपर्यंत पालघर जिल्ह्यात  जोरदार ते अति जोरदार (अतिवृष्टी ) पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.  


इतर महत्वाच्या बातम्या


ABP Majha Special : डोंगरातून, झाडांच्या आडून वाहणाऱ्या नदीने त्र्यंबकेश्वरमधील शेंद्रीपाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट रोखली


तेलंगणातील महबूबनगर मोठी दुर्घटना टळली, पुराच्या पाण्यात बुडालेल्या स्कूल बसमधून 30 मुलांची सुखरुप सुटका


Maharashtra Rains LIVE: राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी रेड अलर्ट; पाहा प्रत्येक अपडेट्स


Maharashtra Dam Update : पावसाचा जोर; धरणं ओसंडली! पाणीसाठ्यात भरपूर वाढ, जाणून राज्यातील धरणांची स्थिती