Palghar Rain Updates : पालघरमध्ये (Palghar) वैतरणा नदीला अचनाक आलेल्या पुरामुळे 10 कामगार अडकून पडले होते. यासर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मुंबई-बडोदा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरु असताना अचानक वैतरणा नदीला पूर आल्यानं कामगार अडकले होते. अखेर तब्बल 15 तासांनी सर्व कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच काल (बुधवारी) पालघरमधील वैतरणा नदीला आलेल्या पुरात काही कामगार अडकले होते. मुंबई-बडोदा महामार्गाच्या उड्डाणपुलाचं काम सुरु होतं. यावेळी पावसाचा जोर वाढू लागल्यानं वैतरणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. याचा कामगारांना अंदाज न आल्यानं ते आडकून पडले आहेत. हे सर्व कामगार गेल्या 15 तासांपासून अडकून पडले होते. वैतरणा नदी पात्रात अडकलेल्या 10 कामगारांची 15 तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. एनडीआरएफची टीमही दाखल झाली आहे. बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं होतं. आधी 6 कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं, त्यापाठोपाठ उर्वरित कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं.
पाहा व्हिडीओ : Palghar Vaitarna River नदीत अडकलेल्या 10 कामगारांची सुटका, NDRF जवानांना मोठं यश
तीन दिवस पालघरला 'रेड अलर्ट'
पुढील तीन दिवसांसाठी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील काही ठिकाणी पूरस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.
भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दुर्गम भागातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजल्यानंतर घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अत्यवस्थ परिस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.