Palghar News : पालघर जिल्ह्यात भात शेती हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. जिल्ह्यातील अनेक लोकांची कुटुंबे या भाताच्या शेतीवर चालतात. भात शेतीवर पालघर जिल्ह्यातील हजारो कुटुंब आपला वार्षिक उदरनिर्वाह करतात. सतत पडणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या रोपण्या पूर्ण केल्या आहेत. पण एकीकडे पावसाचा जोर ओसरला आहे तर दुसरीकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या खेकडा सतावत असून येथील खेकड्यांमुळे जिल्ह्यातील शेती संकटात आली आहे.


पालघर जिल्ह्यात पावसाळ्यात 75 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर दरवर्षी भात लागवड केली जाते. आजही पालघरच्या ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जात असून आताच शेतकऱ्यांनी आपली भात रोपणाची कामं पूर्ण केली आहेत. आतापर्यंत या भात पिकांवर कोणत्याही रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला नसला तरी सध्या जिल्ह्यातील शेतकरी खेकड्यांमुळे त्रस्त आहेत. शेतीच्या सकल भागात खेकड्यांचा प्रादूर्भाव वाढला असून येथील खेकडे सध्या रोप नष्ट करत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत . 


पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जात असून जव्हार, मोखाडा,  विक्रमगड, डहाणू, तलासरी या परिसरात भात शेती हा येथील कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र मुसळधार पावसामुळे वाढलेल्या खेकड्यांची संख्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. यावर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या खेकड्यांची विल्हेवाट लावण्याचं आवाहन कोसबाड कृषी केंद्रामार्फत करण्यात आलं आहे. खेकड्यांचा प्रादूर्भाव असलेल्या ठिकाणी पक्षांची घरटी तयार करणे, रात्रीच्या सुमारास सतत टॉर्च किंवा कंदील घेऊन फिरणे, तसंच विविध औषधांचा वापर करून खेकडे नष्ट करणे हे यावर मूळ उपाय असल्याचं सुद्धा तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. 


पालघरच्या ग्रामीण भागात आजही खेकडे मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून हेच खेकडे सध्या शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळे हे खेकडे लहान असतानाच नष्ट करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय. मात्र यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि औषध वाटप करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. मात्र शेतातील खेकड्यांचे वाढते प्रमाण पाहता शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास  हिरावून घेतात की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या


पिझ्झा, बर्गर आणि बेकरी प्रोडक्ट खाताय? अधिक सेवनाने वाढतोय मृत्यूचा धोका, दरवर्षी 5.40 लाख लोक बळी