Bacchu Kadu Fine : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना उस्मानाबाद न्यायालयाने (Osmanabad Court) 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन आरोपींना देखील दंड ठोठावला आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. 


बच्चू कडू यांना कोर्टाचे खडेबोल
2019 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनादरम्यान वाद झाला होता. यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 14 जानेवारी 2019 पासून प्रलंबित आहे. सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने उस्मानाबाद कोर्टाने बच्चू कडू यांना खडेबोल सुनावले आहेत. तसंच यापुढे सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्याची तंबी देखील जिल्हा न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी दिली आहे. 


मागील महिन्यात मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणी कडू यांना नियमित जामीन मंजूर 
याआधी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना नियमित जामीन मंजूर केला होता. साल 2018 मध्ये केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात त्यांना गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्याच दिवशी तातडीने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांनी ताप्तुरता जामीन मिळवला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी रितसर नियमित जामीनासाठीही अर्ज केला होता. ज्यावर सुनावणी घेत न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 21 सप्टेंबर रोजी या प्रकरणात कडू यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यासह तितक्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. तसंच तपासयंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देत कोणत्याही साक्षी पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे आदेशही दिले होते.


बच्चू कडू कायम चर्चेत
आमदार बच्चू कडू हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची खरडपट्टी काढतात. तर कधी ते हातही उगारतात. त्यांनी केलेल्या मारहाणीचा प्रत्यय अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना आला आहे. बच्चू कडू हे आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असले तरी, कधी कधी भलतेच वर्तन करुन बसतात. त्यामुळे त्यांच्या कामापेक्षा वर्तनाचीच अधिक चर्चा होते किंवा त्यांच्यावर टीका केली जाते.


इतर महत्त्वाची बातमी


आ. बच्चू कडू यांना न्यायालयाचा दिलासा, मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणी जामीन मंजूर