Ganeshotsav 2022 : निर्बंध नाही, पण पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्या, मनपा आयुक्तांचे आवाहन
सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्तीसाठी 4 फुट उंचीची मर्यादा नाही. त्यामुळे चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूर शहराबाहेर करण्याबाबतही मनपा आयुक्तांनी आवाहन केले आहे.
नागपूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार यंदा महाराष्ट्रात गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा साजरा होणारा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) निर्बंधमुक्त असला तरी नागरिकांनी जबाबदारीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवाकरिता सुधारित मार्गदर्शीका जारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी घेण्यात येणारे 200 रुपये शुल्क पुर्णपणे माफ करण्यात आले आहे. मूर्तीकारांच्या मंडपाकरीताचे शुल्क प्रमुख अग्नीशमन अधिकारी यांच्याकडून पुर्णपणे माफ करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या मंडप उभारणीबाबत उद्यान विभाग, मालमत्ता विभाग व खाजगी भुखंडावर आकारण्यात येणारे शुल्क देखील माफ करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी 4 फुट उंचीची मर्यादा घालण्यात आली होती. ती मर्यादा हटविण्यात आली असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध असणार नाहीत. घरगुती गणेश मूर्तीसाठी याअगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती, तरी आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतू घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने 2 फुट उंचीची मर्यादा पाळण्याचे आवाहनही मनपा आयुक्तांनी केले आहे. गणेश मंडळांनी परवानगीचे अर्जासोबतच किती फुटाचा गणपती राहणार आहे व तो कुठे विसर्जन करणा आहे हे पण नमूद करावे, जेणेकरुन त्याप्रमाणे पोलीस विभागास बंदोबस्त तयारी करणे सोयीचे होईल, असेदेखील म.न.पा.आयुक्तांनी सूचीत केले आहे.
गणेश मंडळांनी आरोग्य विषयक उपक्रम शिबीरांना प्राधान्य द्यावे
पुजा आयोजक समिती, गणेश उत्सव मंडळ, व्यक्ती यांनी गणेश उत्सवामध्ये आरोग्य विषयक उपक्रम किंवा शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. तसेच सामाजीक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. श्री गणेशाचे आगमन आणि विर्सजन रस्त्यांवर संबंधित वीज पुरवठादार यांच्या मार्फत वीजेच्या व्यवस्थेबाबत संबंधीत झोनचे सहायक आयुक्त यांच्या स्तरावर चर्चा करुन आवश्यक ती सुधारणा (दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येईल. गणेशोत्सवाकरीता मंडप शुल्क माफ करण्यात आले असेल तरी सुध्दा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या अटी व शर्तीचे जसे- अग्नीशमन दलाचे कोडीफाईड शर्ती, अनशापन खात्याचे अटी व शर्ती, प्लास्टीक व थर्माकोल बंदीबाबत शासकीय निर्देश आदींचे पालन करणे आवश्यक आहे.
विसर्जनास तलावात पूर्णपणे बंदी
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. श्रीगणेशाच्या मूर्तींचे शहरातील तलावातील विसर्जनावर पूर्णपणे बंदी आणली आहे. शहरातील विविध भागांमध्ये विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मूर्तीसाठी 4 फुट उंचीची मर्यादा नाही. त्यामुळे चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूर शहराबाहेर करण्याबाबतही मनपा आयुक्तांनी आवाहन केले आहे. शहरातील कृत्रिम विर्सजन स्थळी नागपूर महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येणार आहे. गणेश आगमन आणि विसर्जनासाठी मिरवणूक काढायची असल्यास त्याबाबत पोलिस विभागाकडून रितसर परवानगी घेण्याबाबतही मनपा आयुक्तांनी सूचित केले आहे.