नवी मुंबई: उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने यशश्रीला अक्षरश: हालहाल करुन ठार मारल्याची (Uran Murder Cae) माहिती समोर आली होती. या नराधमाने तिच्या मृतदेहाची विटंबना केली. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा (Yashashri Shinde) मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपामध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता.
पोलिसांना या मृतदेहाचा पत्ता लागेपर्यंत तेथील कुत्र्यांनी यशश्रीच्या मृतदेहाचे लचके तोडले होते. त्यामुळे अत्यंत भयावह अवस्थेत यशश्रीचा मृतदेह आढळून आला. यशश्रीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अखेर तिच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलवण्यात आले. यशश्रीचे कपडे आणि तिच्या अंगावरील टॅटूवरुन तिची ओळख पटवण्यात आली.या घटनेनंतर संपूर्ण समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणातील संभाव्य आरोपी दाऊद शेख याच्यावर कठोर कारवाईची आग्रही मागणी होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. त्याच्याकडून मृत्यूपूर्वी यशश्रीवर बलात्कार करण्यात आला होता का, याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या घटनेनंतर दाऊद शेख या आरोपीला पकडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. दाऊद शेख याने यशश्री शिंदे 15 वर्षांची असतानाही तिच्यावर अत्याचार केले होते. दाऊद शेख हा एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्याने 2018 साली पहिल्यांदा यशश्री शिंदे हिला पाहिले. त्यावेळी यशश्री 15 वर्षांची होती. दाऊद शेखने त्यावेळी यशश्रीला आपल्या जाळ्यात ओढले आणि 2019 साली त्याने तिच्यावर अत्याचार केले होते. त्यावेळी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार दाऊद शेख याच्यावर पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याची तुरुंगातून रवानगी करण्यात आली होती. अलीकडेच तो तुरुंगातून सुटला होता. यानंतर त्याने पुन्हा यशश्रीचा पाठलाग करायला सुरुवात केली. दाऊद शेख सतत यशश्रीला फोन करायचा. अखेर 25 जुलैला ती घराबाहेर पडल्यानंतर दाऊद शेखने तिला गाठून तिची हत्या केल्याचा संशय आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशश्री पनवेल स्टेशनकडे गेली. सायंकाळी साधारण साडेचारनंतर तिचा फोन बंद झाला. त्यानंतर यशश्री कोणालाच दिसली नाही.
मनमिळाऊ यशश्रीच्या जाण्याने शिंदे कुटुंबीयांवर आघात
यशश्री शिंदे ही तिच्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत होती. ती बेलापूर येथील एका कंपनीत कामाला होती. ती वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत होती. शिक्षण सुरु असताना ती बेलापूर येथील एका खासगी कंपनीत कामाला होती. यशश्री ही अतिशय गुणी आणि मनमिळाऊ मुलगी होती. ती घरी सर्वांची काळजी घ्यायची. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती बेलापूर येथील कॉल सेंटरमध्ये कामाला लागली होती. 25 जुलैला ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. अखेर 27 जुलैला तिचा मृतदेह सापडला होता. तिच्या मृतदेहाची अवस्था अत्यंत भयावह होती. पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना दिसले की, एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. मृतदेहावर असंख्य जखमा झालेल्या होत्या. कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत होते. यशश्रीच्या कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर चाकूचे वार केलेले होते.
या घटनेनंतर यशश्री शिंदेच्या कुटुंबीयांनी दाऊद शेख हिनेच तिची हत्या केल्याचा आरोप केला. दाऊद 2019 मध्ये माझ्या मुलीला त्रास देत होता, आम्ही त्याच्याविरोधात पॉस्कोतंर्गत गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही दिवसांपासून दाऊद तिला टॉर्चर करत होता, असे यशश्रीने मला सांगितल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली.दाऊदनेच तिला मारले आहे, याची आम्हाला 100 टक्के खात्री आहे. यशश्री घरात सगळ्यांशी हसूनखेळून राहायची. ज्याप्रकारे दाऊदने तिचे तुकडे केले तसेच त्याचेही तुकडे करा, तरच यशश्रीला न्याय मिळेल, अशी भावना यशश्रीच्या मावशीने व्यक्त केली.
कॉल रेकॉर्डमधून धक्कादायक बाबी उघड
दाऊद शेख याने यशश्रीची हत्या केल्याचा दावा केला जात असला तरी पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी यशश्रीचे कॉल रेकॉर्ड तपासले. सीडीआरमधून मिळालेल्या एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचं दिसून आले. या नंबरवरून यशश्रीला कॉल येत आणि जातही होते. नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता. काही वर्षांपूर्वी याच्याविरोधात यशश्री आणि तिच्या कुटुंबीयांनी पॉक्सो केसअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. अशात बेपत्ता झालेल्या यशश्रीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला. तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद आहे. ज्या दाऊदला यशश्री आणि तिच्या कुटुंबीयांनी तुरुंगात पाठवलं होतं, त्याच्यासोबत यशश्री संपर्क का ठेवत होती, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यशश्री तासनतास त्याच्याशी फोनवरून बोलत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
भाजपचे नेते आक्रमक
यशश्री शिंदे हिच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. याप्रकरणातील आरोपी दाऊद शेख असल्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार आहे, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. नितेश राणे आणि प्रवीण दरेकर यांनी लव्ह जिहादचा आरोप करत अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची मागणी केली आहे. आमचं हिंदुत्त्वावादी सरकार दाऊद शेखला शोधून काढून त्याला योग्य ती शिक्षा देईल, असे नितेश राणे यांनी सांगितले. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन दिले. पीडीत मुलगी दलित समाजातील होती, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा लागणार आहे. दाऊद शेखबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, यांची ही पद्धत आहे, मुलींना फसवतात, पळवतात आणि मग मारून टाकतात. तीन महिन्यांपूर्वी मानखुर्द परिसरातील एका मुलीची इथं आणून अश्याच प्रकारे हत्या करण्यात आली होती. हे लव्ह जिहादचे प्रकार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
VIDEO: यशश्री शिंदेंच्या कुटुंबीयांची प्रतिक्रया
आणखी वाचा
Uran Murder : उरण पीडितेला न्याय कधी मिळणार? हत्येच्या तीन दिवसानंतरही आरोपीचा ठावठिकाणा लागेना