नवी मुंबई: राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रवक्ते योगेश चिले यांनी केले आहे. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भातील एक व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओतून योगेश चिले यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान साधले आहे.


गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन बहि‍णींचे निर्घृण खून झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात. त्यांनी धर्मवीर-1 आणि धर्मवीर-2 असे दोन चित्रपट काढले. या दोन्ही चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांचे दोन्ही हात राख्यांनी भरल्याचे दाखवण्यात आले आहे. उद्देश एकच की, आनंद दिघे साहेब कशाप्रकारे बहि‍णींचे रक्षण करायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तु्म्ही आनंद दिघे यांचे शिष्य आहात. तुम्ही राज्यातील बहि‍णींसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Scheme) आणली. या योजनेच्या माध्यमातून बहि‍णींना महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. पण तुमच्या या लाडक्या बहि‍णींना महिन्याला 1500 रुपयांची गरज नाही. त्या पैसे कमावू शकतात. फक्त त्या जिथे पैसे कमवायला जातात, जिथे नोकरी करतात, जिथे शिक्षण घ्यायला जातात, तिकडे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. ही सुरक्षा तुम्ही दिली पाहिजे. त्यांना लाडकी बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार, हे महाराष्ट्र पाहणार आहे, असे योगेश चिले यांनी व्हीडिओत म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील इतर नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागणार आहे.




उरणमध्ये तरुणीची हत्या


उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. या तरुणीचा छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आला. तरुणीची हत्या करुन तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली. तिचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या. यशश्री शिंदे बेलापूरमध्ये एका कंपनीत कामाला होती आणि उरणमध्ये तिच्या कुटुंबियांसह राहत होती. 25 जुलै रोजी ती सकाळी कामाला जाण्यासाठी निघाली होती, मात्र तेव्हापासून ती बेपत्ता होती. तिचा फोन लागत नसल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि यशश्री बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस यशश्रीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळीत झाडीत एक मृतदेह आढळून आला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. 


आणखी वाचा


माझी लाडकी बहीण योजनेत नव्याने पाच मोठे बदल, अर्ज करताना तिसरा बदल फार महत्त्वाचा!