नवी मुंबई :  उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबईची मेट्रो (Navi Mumbai Metro) ही प्रवाश्यांच्या सेवेत येणार आहे. कोणत्याही प्रकारचं उद्घाटन न करता बेलापूर ते पेंधर मार्गावर नवी मुंबईची पहिली मेट्रो धावणार उद्या धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार होतं. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर विना उद्घाटन ही मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे कित्येक वर्षांपासून अुपरं असणारं नवी मुंबईकरांचं मेट्रोचं स्वप्न आता साकार होईल. 


 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. परंतु  सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. पण बऱ्याच कारणांमुळे या मेट्रोचे उद्घाटन सातत्याने पुढे ढकलण्यात येत होते. पण आता हे उद्घान न करताच सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 


कोणत्या स्थानकांचा समावेश?


नवी मुंबईच्या या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये  सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता आता मिटणार असल्याचं सांगण्यात येतय. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे  या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे.


कोणाला होणार मेट्रोचा सर्वाधिक फायदा?


तळोजा ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. शिवाय कळंबोलीचे स्टील मार्केट महामुंबईतील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. येथे रोज हजारो चाकरमानी ये-जा करत असतात. या चाकरमान्यांसाठी एनएमएमटीची बससेवा आहे. परंतु, ही बससेवा अतिशय अपुरी आहे. ही मेट्रो सुरू झाली तर या प्रवाशांसह बेलापूर, तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.  त्यामुळे आता काहीच दिवसांत नवी मुंबईची मेट्रो ही प्रवाश्यांच्या सेवेमध्ये येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


हेही वाचा : 


'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप