Navi Mumbai Crime News: सध्याचं युग डिजिटल युग आहे असं म्हटलं जातं. पण याच डिजिटल युगात सांभाळून राहण्याचा सल्लाही जाणकारांकडून दिला जातो. डिजिटल युगात कधी कोणती चूक होईल आणि त्याची शिक्षा भोगावी लागेल, याचा काहीच नेम नाही. असाच काहीसा प्रकार नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका व्यक्तीसोबत घडला असून नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे आता डोकं फोडण्याची वेळ आली आहे. फेसबुकवरील (Facebook Online Fraud) ऑनलाईन कर्जाच्या ऑफरवर विश्वास ठेवल्यामुळे तब्बल 90 हजारांचा चुना लागला आहे. 


ऑनलाईन फसवणुकीचे (Online Scam) प्रमाण सातत्यानं वाढत आहे. याशिवाय ऑनलाईन फसवणुकीसाठी नवनवीन पद्धती शोधल्या जात आहेत. याच संदर्भात फेसबुक फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या 56 वर्षीय व्यक्तीसोबत फसवणुकीची घटना घडली आहे. भूरळ पडली ती, फेसबुकवरच्या झटपट कर्जाच्या ऑफरची. एका फेसबुक पोस्टमध्ये 2 तासांत ऑनलाईन कर्ज देण्याचा दावा करण्यात आला आणि याच ऑफरमुळे तब्बल 90 हजार रुपये गमावण्याची वेळ नवी मुंबईतील व्यक्तीवर आली आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एका लॉजिस्टिक कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीनं आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या कर्जासाठी अर्ज केला होता. 


फेसबुकवर कर्जासाठी केलं अप्लाय 


पीटीआय रिपोर्टनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या 56 वर्षांच्या एका व्यक्तीनं 8 नोव्हेंबरला फेसबुकवर कर्जासंदर्भात एक पोस्ट पाहिली आणि लगेचच कर्जासाठी अप्लाय केलं. लोन अप्लाय केल्यानंतर एका फायनांशियल कंपनीच्या प्रतिनिधीचा फोन आला. ज्यामध्ये ऑनलाईन लोन मिळवण्यासाठी काही चार्जेस देण्याबाबत सांगितलं होतं. यामध्ये इन्शोरन्स चार्ज, जीएसटी, एनओसी चार्ज, आरबीआई चार्ज आणि एडवांस्ड इंस्टॉलमेंट देण्याचा दावा करण्यात आला आहे. अशाप्रकारे थोडे थोडके नाहीतर तब्बल 90 हजार रुपये वसुल करण्यात आले. 


कर्जाच्या नादात लागला 90 हजारांचा चुना 


कर्जाच्या ऑफरच्या नादात मुंबईतील व्यक्तीच्या बाजूनं 90 हजार रुपये चार्ज देण्यात आला. परंतु, त्यानंतर या व्यक्तीला कोणतंच कर्ज देण्यात आलं नाही. जेव्हा लोन चार्जच्या नावाखाली एक्स्ट्रा अमाउंट मागण्यात आली, तेव्हा त्या व्यक्तीला जाणीव झावी की आपल्यासोबत फ्रॉड झाला आहे. अशातच संबंधिक व्यक्तीनं पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. 


तुमच्यासोबत असं काही होऊ नये म्हणून काय कराल? 


फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करू नका
वैयक्तिक कर्ज, फ्रीलान्स जॉब किंवा गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका
तुमचा वेब ब्राउझर किंवा सोशल मीडिया चॅनेल काय म्हणतात? त्यावर कधीही विश्वास ठेवू नका
वैयक्तिक कर्जासाठी फक्त बँक किंवा वित्तीय संस्थेवर विश्वास ठेवा.