ABP Majha Special : सत्ता संघर्षात काय झाडी, काय डोंगार हा डायलॉग चांगलाच गाजला. मात्र नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरातून, झाडांच्या आडून वाहणाऱ्या नदीने विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट पुढील चार महिन्यासाठी रोखली आहे. याच भागातील महिलांची हंडाभर पाण्यासाठीची जीवघेणी कसरत उभ्या महाराष्ट्राने बघितली होती, आता इथल्या विद्यार्थ्यांचा पाण्यामुळेच शिक्षणासाठीचा जीवघेणा संघर्ष सुरु झाला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडामध्ये राहणारे सर्व विद्यार्थी, पालकांसह शाळेत जाण्यासाठी एकत्र जमतात. मात्र खळाळून वाहणाऱ्या तास नदीने त्यांची वाट रोखते. नदीला पूर आल्याने विद्यार्थी नदी पार करु शकत नाहीत. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी पाण्याची पातळी कमी असल्याने मुलांना खांद्यावर घेऊन पालक नदी ओलांडण्याची जोखीम घेत होते. यावेळी एक मुलगा थोडक्यात बचावला, स्थानिक नागरिक मदतीला धावून गेल्याने सुदैवाने मुलगा वाचला, मात्र त्याचे दप्तर, छत्री वाहून गेली. नदीची पातळी प्रचंड वाढली आहे. पाण्याचा प्रवाह देखील वेगवान असल्याने ग्रामस्थ पाण्यात उतरुन, पोहून पाण्याचा अंदाज घेतात. मात्र आता मुलांना खांद्यावर बसवून नदी पार करण्याचे धाडस कोणी करत नाही. दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती उद्भभवते मात्र कोणाचे लक्ष नाही
ही तीच नदी आहे जी नदी ओलांडण्यासाठी महिलांना लाकडी बललीवरुन जीवघेणा प्रवास करावा लागत होता. मागील सहा महिन्यापासून डोंगराच्या कडेकपारीतून पाण्याचा शोध सुरु होता. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढाकाराने लोखंडी पूल बसवण्यात आला, मात्र तो पूलही बराच लांब असल्याने शाळा ओस पडली आहे. पैलतिरावरुन विद्यार्थी येतच नसल्याने दोन-चार विद्यार्थ्यांनाच शिक्षकांना शिकवावं लागत आहे. साधणारपणे 200 लोकवस्तीचा शेंद्रीपाडा आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा पट 17 चा आहे त्यापैकी 13 मुलांना नदी ओलांडून यावं लागतं. नदीला पाणी असल्याने दरवर्षी चार महिन्यासाठी शाळा बंद होत असल्याने अखेर मागील वर्षी काही पालकांनी आपल्या पाल्याचे दाखले काढून घेतले.
विद्यार्थी नदी ओलांडू शकत नसल्याने एबीपी माझ्याच्या टीमने धो धो पावसात डोंगर दऱ्यातील दोन-चार किलोमीटरची पायवाट तुडवीत विद्यार्थ्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र वाट एवढी खडतर, धोकादायक होते की कधी पाय घसरतो आणि खाली पडतो याचा नेम नाही. भर पावसात घामाच्या धारा काढणारा हा प्रवास ही लहान लेकरं कसा करणार हा प्रश्न आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने 25 ते 30 फूट उंचीवर लोखंडी पूल बसवण्यात आला मात्र अजून पावसाचा जोर वाढला तर पुलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आता आदित्य मंत्री नाहीत, त्यामुळे या भागाकडे कोण लक्ष देणार असा सवाल उपस्थित होत आहे. पावसाळ्यातील संभाव्य परिस्थितीची माहिती चार महिन्यांपूर्वीच स्थानिकांनी दिली होती. मात्र प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप होत आहे.
आदिवासी पड्यावरील नागरिकांना संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला आहे, यातून महिला, लहान मुलांचीही सुटका नाही. हा केवळ एकच पाडा नाही तर पेठ सुरगाणा तालुक्यातील अनेक पाड्यावर अशीच परिस्थिती असल्याने हे प्रश्न कधी सुटतील असा सवाल उपस्थित होत आहेत. डोंगर, झाडी बघण्यासाठी लोकप्रतिनिधींनी गुवाहाटीकडे न जात आदिवासी पाड्यावर मुक्काम ठोकला तर विकासाची गंगा नक्की वाहणार यात शंका नाही.