Sanjay Rautगेल्या पंधरा दिवसांत राज्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. मात्र त्यानंतर शिवसेनेत अधिकच फूट पडण्यास सुरवात झाली आहे. अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामा देत आहेत. शिवाय काही खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. शिवसेनेत निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी तसेच पक्षाला उभारी देण्यासाठी स्वतः खासदार संजय राऊत मैदानात उतरणार असून त्याची नाशिकपासून करणार आहेत. यासाठी ते उद्यापासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर असल्याची माहिती आहे.


राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर शिवसेनेची उतरंड सुरू झाली आहे. राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटाच्या समर्थनार्थ राजीनामा देत आहेत. त्यामुळे हळूहळू शिवसेनेतुन एकप्रकारे गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मोट बांधली आहे. शिवाय शिंदे गटातील आमदार ज्यांच्यावर आगपाखड करीत आहेत ते खासदार संजय राऊत स्वतः मैदानात उतरले आहेत. 


शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी शिवाय कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी खासदार संजय राऊत उद्यापासून नाशिक दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी ते नाशिकला दाखल होणार असून शुक्रवारी ते पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. तसेच शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून याद्वारे नाशिकमधून ते पुन्हा पक्ष बांधणीला सुरवात करणार आहेत. 


नाशिक शिवसेनेचे खंदे समर्थक शिंदे गटात -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देत सत्तेतून बाहेर पडले. आता शिंदे गटाकडे शिवसेनेचे चाळीस आमदार आहेत. यामध्ये नाशिक नांदगाव चे आमदार सुहास कांदे व माजी कृषिमंत्री दादा भुसे हे देखील आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महत्वाचे दोन मावळे शिंदे गटात सामील झाल्याने नाशिकमध्ये शिवसेना मोठे खिंडार पडले आहे. हे खिंडार भरून काढण्यासाठी शिवसेनेला नाशिक ग्रामीण मधून खंबीर नेतृत्व उभे करणे आवश्यक असल्याने खासदार संजय राऊत यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणी महत्वाची असल्याने शिवसेनेने नाशिकमधून सुरवात करण्याचे ठरवले असल्याचे दिसून येते.


असा आहे दौरा -
गुरुवारी सायंकाळी नशिकमध्ये दाखल होणार आहेत. तर शुक्रवारी पदाधिकारी बैठका, पत्रकार परिषद घेणार होईल. त्यानंतर शनिवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.