Ratnagiri News : खेड तालुक्यातील धनगरवाडी नांदीवली या गावात भर पावसात ओढ्यातून शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. धनगरवाडीतील 12 शाळकरी मुलं वाहत्या पाण्याच्या ओढ्यातून शाळेत जाण्यासाठी कसरत करताना दिसत आहे. डिजिटल इंडियाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतात शाळकरी मुलांना रोज धोकादायक प्रवास करावा लागतोय.


भर पावसात ओढ्यातून शाळकरी मुलांचा जीवघेणा प्रवास


धनगरवाडीतील 12 मुले नांदीवली दंडवाडी गावातील शाळेत जातात. शाळेत जातांना रस्त्यात असणारा ढेबेवाडीचा ओढा पार करुन पलीकडे जावे लागते. सध्या हा ओढा पाण्याने भरला असून मोठ्या गतीने वाहत आहे. आणि त्यातूनच या चिमुकल्या विद्यांर्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. दरम्यान या ओढ्यावर लोखंडी साखव म्हणजेच पूल व्हावा अशी कित्येक दिवसांपासून ग्रामस्थ मागणी करत आहेत. पण अद्यापही ही मागणी पूर्ण होत नाही. ही मागणी पावसाळ्यात जीव गेल्यावर पूर्ण होणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.


पावसाळयात पालकांसमोर नेहमीचा यक्ष प्रश्न


दरम्यान, पावसाळयात येथील नागरिकांना बाजारहाट तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा गाठायची म्हटली तरी त्यांच्यासमोर पेच असतो. आडवाटेने गेलेल्या घाटी रस्त्याने मोठमोठे ओहोळ, ओढे पार करत पलीकडे जाण्याशिवाय गत्यंतर नसते. जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना भर पावसात ओढे पार करण्यासाठी पावसाळयात पालकांसमोर नेहमीचा यक्ष प्रश्न ठरतो. या महत्त्वपूर्ण समस्येकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतेय, असा आरोप नागरिक करत आहेत. धनगरवाडी नांदीवली या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पावसाळय़ात जीवघेणा प्रवास करावा लागत असतानाच येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी
धनगरवाडीतील 12 विद्यार्थी नांदीवली दंडवाडी विद्यामंदिरात शिक्षण घेत आहेत. पावसाळय़ात शाळेचा पल्ला गाठायचा तर वाटेत ओहोळ असल्याने पूरजन्य परिस्थितीत जीवघेणा प्रवास करावा लागतो. पावसाळयात मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक असल्याने पूल लवकरात लवकर बांधावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. येथील ओढ्याला पुराचे मोठया प्रमाणावर पाणी असते. येथील संपूर्ण परिसर पाण्यात जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये भीतीचे वातावरण असते, यामुळे इतर गावांचा संपर्क तुटतो. एकूणच या ठिकाणी पूल बांधणे गरजेचे झाले आहे.