पुणे : पुणे लोकसभेकडे  (Pune Lok Sabha 2024 राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी  Raj thackeray) पुण्याचे दौरे वाढवले आहेत. पुण्यात पदाधिकारी आणि नेत्यांच्या वरचेवर बैठका घेतल्या जात आहेत. मनसेमधील अंतर्गत वाद अनेकदा समोर आला आहे. मात्र त्यातच आता मनसेचे फायरब्रॅंडनेते वसंत मोरे (Vasant More)  यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन (MNS Vardhapan Din Nashik) साजरा होत आहे. त्यानिमित्ताने वसंत मोरे नाशिकला (Nashik MNS) गेले आहेत. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमापूर्वी  त्यांनी ही इच्छा एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. 


पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेन, असा दावा वसंत मोरेंनी केला आहे. नाशिकमध्ये मनसेने सत्तेचं तोरण बांधलं होतं. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मेळाव्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे, असं ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहिल, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात बोलताना साईनाथ बाबरांना मोठी संधी देण्याबद्दल सुतोवाच केले होते. यानंतर आता पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी सूचक व्हाट्सॲप स्टेट्स ठेवल्यानंतर पुन्हा एकदा मनसेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. शर्मिला ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी स्टेट्स ठेवत राजकीय खळबळ उडवून दिली होती. "कुणासाठी कितीबी करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे, योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार." त्यामुळे वसंत मोरे यांनी नेमका कोणाला संदेश दिला आहे याची चर्चा रंगली. त्यानंतर थेट ते शरद पवारासोबत दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र त्यानंतर आता त्यांनी थेट मी इच्छूक असल्याचं सांगून टाकलं आहे. 


राज ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष


मनसेकडून आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज राज ठाकरेंची तोफ नाशिकमधून धडाडणार असल्याने नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. वर्धापन दिनामुळे मनसेने जोरदार तयारी केली असून सर्व शहर मनसेमय झाले आहे. 


इतर महत्वाची बातमी-



Sandeep Deshpande : मनसे महायुतीसोबत जाणार का? संदीप देशपांडेंचे सूचक वक्तव्य