MNS Vardhapan Din : आज मनसेचा १८ वा वर्धापन दिन (MNS Vardhapan Din) नाशिकमध्ये साजरा होत आहे. नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात हा सोहळा पार पडत आहे. यानिमित्त नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मनसे महायुतीसोबत जाणार का? याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.


संदीप देशपांडे म्हणाले की, गेले 18 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक सातत्याने संघर्ष करत आहेत. राज साहेब आज यापुढे पक्षाची दिशा कशी असेल? कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचे आहे. याबाबत आम्हाला मार्गदर्शन करतील. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू. 18 वर्षापासून आम्ही काम करत आहे. हा आमच्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे. मनसे यापुढे सत्तेच्या दिशेने वाटचाल करेल.


मनसे महायुतीसोबत जाणार का?


महायुतीसोबत मनसे जाणार का? असे विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही महायुतीसोबत जाऊ की नाही, याबाबतचा निर्णय राज साहेब घेतील. पण एक मनसैनिक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सत्तेत असला पाहिजे या दृष्टीने आम्ही नक्की मार्गक्रमण करू, मलाही वाटतं राज साहेबांनी मुख्यमंत्री व्हावे, असे सूचक वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केले आहे.  


राजकारणाचा झालेला चिखल राजसाहेबच साफ करू शकतात


सध्याच्या राजकारणावर संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल राजसाहेबच साफ करू शकतात. जनतेला जर चांगला राजकारणी कोणी वाटत असेल तर ते राज ठाकरे आहेत, असे देखील संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 


राज ठाकरे काय भूमिका घेणार ? 


मनसेकडून आगामी निवडणुका लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज राज ठाकरेंची तोफ नाशिकमधून धडाडणार असल्याने नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.  वर्धापन दिनामुळे मनसेने (MNS Vardhapan Din) जोरदार तयारी केली असून सर्व शहर मनसेमय झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Vasant More : पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं!


MNS Vardhapan Din : आज मनसेचा 18 वा वर्धापन दिन; राज ठाकरेंची तोफ नाशकातून धडाडणार